जोडण्या सुरू | ग्रामपंचायतीचे घमासाम ; पक्ष,गटतट शिवाय व्यक्तीमहत्त्व पॅनेलची तयारी सुरू झाली.
जत,प्रतिनिधी: जत तालुक्यामध्ये 30 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार असून, त्याचे बिगुल आता वाजले असल्याने पक्षीय पातळीवरूनही जोडण्या सुरू झाल्या आहेत. सर्वच पक्षानी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून जोडण्या सुरू केल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवरच्या चाचपण्या सुरू झाल्या आहेत. 23 डिसेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत असल्याने पॅनेल निर्मितीला गती आली आहे. संरपच पदाचे उमेदवार पायाला भिंगरी लावून पळत आहेत.
तालुक्यातील 117 ग्रामपंचायतींपैकी 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा फड रंगणार असून, याचमुळे ग्रामीण भागामध्ये आतापासूनच टोकाची ईर्ष्या सुरू झाली आहे. आतापासूनच निवडणूक फेव्हर ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक प्रमाणात दिसून येत आहे. तालुक्यात संरपच पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नसल्याने मोठी चुरस होण्याची शक्यता आहे.

एकूणच जत तालुक्यामध्ये गावपातळीवर सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता निवडणूकमय वातावरण तयार झाले आहे. आगामी राजकारणासाठी ग्रामीण भागातील या निवडणुकांवर वरिष्ठ नेत्यांचाही डोळा असून, यातील अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात येण्यासाठी तालुक्यातील नेत्यांनीही आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. यामुळे निवडणूक जाहीर होताच यासाठीच्या बैठका सुरू झाल्या आहेत.