पंधरा-पंधरा दिवस झाले रोहित्र मिळेना; पाणीसाठा असूनही पिके काेरडीच
जत,प्रतिनिधी : यंदा चांगला पाऊसमान झाल्यामुळे विहिरी, बोअर, नद्या, नाल्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी वेळेवर रोहित्र (ट्रान्सफर्मर) मिळत नसल्याने अनेक पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. आठ ते पंधरा दिवस रोहित्र मिळत नसल्याने पिके कोरडी पडत आहेत.
रब्बीबरोबरच खरीपांची मोठया प्रमाणात पेरणी केली जाते. याशिवाय जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्राबरोबरच फळपिकांचेही क्षेत्र वाढले आहे.
मागील चार ते पाच वर्षापासून दुष्काळाचा सामना करणार्या शेतकर्यांना यंदा चांगल्या पावसाने दिलासा दिला असला तरी महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळे रोहित्रे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातील शाखा कार्यालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. महावितरणकडून या शेतकर्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा देण्यात येतो.

हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे.
तक्रार करूनही प्रतीक्षेतच
रोहित्र जळाल्याची तक्रारी स्थानिक कार्यालयात केल्यानंतर तेथील कर्मचारी बघू, करू अशी उत्तरे देतात, त्यानंतर वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्याला कुठे न्याय मिळतो. पण तक्रार केल्यानतर सुध्दा किमान रोहित्र मिळण्यास किमान 10 दिवस लागतातच.
खासगी दलाल गावागावात
आम्ही तुम्हाला रोहित्र बदलून देऊ असे सांगून शेतकर्याकडून पैसे उकळणारे खासगी दलाल आता गावागावात दिसू लागले आहेत. त्यांचा महावितरणशी काहीही सबंध नसतानाही हे लोक बिनधास्तपणे शेतकर्याकडून पैसे वसूल करू लागल्याचेही सांगण्यात आले.