बेवनूरमधील दिलीप बिल्डकॉनचे अवैध उत्खनन बंद करावे | संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
आंवढी,वार्ताहर : बेवनूर ता.जत येथे दिलीप बिल्डकॉन कंपनीचे बेकायदेशीर सुरू असलेले उत्खनन बंद करावे,अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे,दिलीप बिल्डकॉन कंपनीने बेवनूर हद्दीत अवैधपणे शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून अमोनिया बोअर ब्लास्ट करत आहेत.त्यामुळे लगतच्या नागरिकांच्या घरांना भेगा पडल्या आहेत. त्याशिवाय शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.
संभाजी ब्रिगेडने केलेल्या तक्रारीवरून दिलीप बिल्डकॉन कंपनीची एन.ओ.सी. रद्द केलेचे कळविले आहे, परंतु अद्याप काम बंद केलेले नाही.तसेच कंपनीकडून अवैध वाहतूक केली जाते.त्यांच्या वाहनामध्ये दगड वाहतूक करत असताना फाळके लावले जात नाही.धूळ मोठ्या प्रमाणात उडते.दगड वाहतूक करणा-या वाहनांवरती ताडपत्री झाकली जात नाही, त्यामुळे रस्त्यावरती दगड पडतात.धुळीमुळे जुनोनी ते बेवनूर रस्त्यावरती अपघाताचे प्रमाणे वाढले आहे.यापुर्वी बेवनूर येथे दादासो शंकर सरगर व वसंत धोंडीराम माने यांचा अपघात झाला आहे.
त्या सदंर्भात सांगोला पी.डब्ल्यू.डी. व जत पंचायत समिती यांनी रस्ता खराब झालेबद्दल वनुकसान भरपाई मिळणेबाबत डि.बी.एल कंपनीस नोटीस देखील काढलेली आहे.तसेच उत्खनन चालू असलेल्या परिसराच्या पश्चिम बाजूस जुनोनी हद्द असून जवळच फॉरेस्ट आहे. त्यांचाही बफर झोन सोडला नाही व जुनोनी ता. सांगोला जि. सोलापूर हद्दीमध्ये फॉरेस्टच्या पश्चिमेस सिमेलगत खडी क्रशर व कॅम्प आहे.त्यामुळे तेथील पशु-पक्षी व वनांचा पूर्ण -हास होवून ध्वनीप्रदूषण, धुळीमुळे हवा प्रदूषण होत आहे.

जत तहसिलकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा झाला आहे,परंतु अद्याप कंपनीवरती कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही व आम्हास नुकसान भरपाई मिळालेली नाही. बोअर ब्लास्ट बंद नाहीत,सायरन नाहीत, संरक्षीत कंपाऊंड, बारबेट वायर नाही व उत्खननही बंद नाही.तसेच डि.बी.एल.कंपनीने उत्खनन चालू करताना शेजारील शेतक-यांचे (जमिन धारकांचे) व लोकवस्तीमधील लोकांचे नाहरकत देखील घेतली नाही.पोलीस ठाणे जत, ता.जत यांनी देखील वारंवार अर्ज करुन त्यांचे अधिकारी शेतकऱ्यांनाच धमकावतात व पोलीसांकडून तुम्हाला उचलून जेलमध्ये टाकतो अशी धमकी देतात व लोकवस्तीमध्ये दगड पडतात,त्यामुळे तेथील जनजिवनास धोका आहे.
यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई,संरक्षक भिंत,वाहतूकीचे नियम पाळेपर्यत काम बंद ठेवावे,याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी स्व:त लक्ष घालावे,असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रेयश नाईक,मोहन पाटील,बापूसो शिंदे,संदिप नाईक आदीच्या सह्या आहेत.
बेवनूर येथील दिली बिल्डकॉन कंपनीचे काम तातडीने बंद करावे,या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिले.