जत : एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्याचे माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 15 डिसेंबर 2020 (मंगळवार).
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दि. 23 डिसेंबर 2020 (बुधवार) ते दि. 30 डिसेंबर 2020 (बुधवार) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत (दिनांक 25,26 व 27 डिसेंबरची सार्व. सुट्टी वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) दि. 31 डिसेंबर 2020 (गुरूवार) सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) दि. 4 जानेवारी 2021 (सोमवार) दुपारी 3 वाजेपर्यंत.
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दि. 4 जानेवारी 2021 (सोमवार) दुपारी 3 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2021 (शुक्रवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायं. 5.30 पर्यंत. मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) दि. 18 जानेवारी 2021 (सोमवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 21 जानेवारी 2021 (गुरूवार) पर्यंत राहील.
दरम्यान जत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाबरोबरच प्रभाग रचनेनुसार भाव- भावकी, स्थानिक पक्षविरहीत आघाड्या, जातीचे समिकरणानुसार आघाड्या-युती केल्या जातात. परंतु सध्या तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकापासून राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्याने तालुकास्तरावरील नेतेमंडळी प्रमाणे स्थानिक गाव पुढारीही एकत्रित येतील का याकडेच लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकात कोणत्या पक्ष्याच्या आघाड्या होणार याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण वाटत असले तरी गावपातळीवरील स्थानिक राजकारणाचा प्रभाव अधिक दिसुन येत असतो.त्यामुळे जतेत महाआघाडीचा प्रयोग होणार का ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
या ग्रामपंचायतीच्या होणार निवडणूका
अंकलगी,अंकले,भिवर्गी, धावडवडी, डोली,घोलेश्वर, गुड्डापूर, गुगवाड, जालिहाळ खुर्द, करेवाडी (ति),कुडनूर, कुलालवाडी, लमाण तांडा उटगी,लमाण तांडा दरीबडची,मेंढीगिरी, मोरबगी, निगडी बुद्रुक,सनमडी,शेडयाळ,शेगाव, सिद्धनाथ, सिगनहळ्ळी,सोनलगी, तिकोडी, टोणेवाडी,उमराणी, उटवाडी, उटगी,वळसंग व येळदरी