जत,प्रतिनिधी : आंवढी ता.जत येथील रद्द झालेल्या रेशन दुकानदारास पाठीशी घालणारे जतचे पुरवठा अधिकारी श्री.गोठणेकर यांची खातेनिहान चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे,अशी मागणी अखिल भारतीय संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा आंवढीचे संरपच आण्णासाहेब कोडग यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी पुणे आयुक्त,जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी, तहसीलदार यांना पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि,आंवढी,ता.जत,जि.सांगली येथील रेशन दुकानदार एस.व्ही.पाटील यांनी कोरोना काळात गरिबासाठी आलेले गहू,तांदुळ गरीब रेशनकार्ड धारकांना न देता अवैध पणे साठा केल्याचे आढळून आले होते.नागरिकांच्या तक्रारीवरून ते धान्य व त्यांच्या दुकांनाची 23/04/2020 तत्कालीन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अशिष ऐरेकर,प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील यांनी आंवढीला भेट देत दुकानातील गंभीर प्रकार बघून तपासणीचे आदेश दिले होते.त्यानुसार तपासणीत दुकानदार पाटील यांच्याकडे 800 किलो धान्य बेकायदेशीर साठा केलेले आढळून आले होते.
ते धान्य जतच्या तहसील कार्यालयाच्या पथकाने जप्त करून त्यांच्यावर कारवाई करत तसा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे दाखल केला होता.हा गंभीर प्रकार बघून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सदरचे दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश 30/04/2020 रोजी दिला होता.मात्र इतका गंभीर
प्रकार असतानाही व गरिबाचे धान्य काळ्याबाजारात विक्रीच्या उद्देशाने इतरत्र साठा करून शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असतानाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे टाळण्यात आले होते.
त्यात जतचे पुरवठा अधिकारी श्री.गोठणेकर यांनी त्यांच्या अशा कृत्याला पाठिशी घालत नियम डावलत कोणत्याही प्रकारे कायदेशीर कारवाई केलेली नाही.
सदरचा बेकायदा साठा केलेले धान्य जप्त करून प्रशासनाने ताब्यात घेत तात्पुरते दुकान चालविण्यास दिलेले लोहगाव येथील एस.एन.चव्हाण यांच्या ताब्यात दिले आहे.
आंवढीतील दुकान रद्द झाल्यानंतर सबंधित दुकानदारांने पुणे विभागीय पुरवठा अधिकारी यांच्याकडे बचाव करण्यासाठी अपिल केले आहे.त्याशिवाय अवैध धान्य साठ्याबाबत जत न्यायालयात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
असे असतानाही जतचे पुरवठा अधिकारी श्री.गोठणेकर यांनी कोणताही लेखी आदेश न काढता सध्याचे रेशन दुकानदार चव्हाण यांना जप्त केलेले धान्य लाभार्थी कार्डधारकांना वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.मुळात बेकायदा साठा केलेेले धान्य कुठून आले,कोणत्या कार्डधारकांच्या धान्यावर रेशन दुकानदाराने डल्ला मारला यांची तपासणी करण्याचे सोडून पुरवठा अधिकारी जप्त धान्य बेकायदेशीर वाटप करण्याचे सांगून काळाबाजार करणाऱ्या धान्य दुकानदाराला एकप्रकारे पुरावा नष्ट करून वाचविण़्याचा प्रयत्न करत आहेत.
कोरोना काळात शासनाने अडचणीतील नागरिकांना आधार देण्यासाठी दिलेले धान्याचा आंवढीसह अनेक गावातील धान्य दुकानदारांनी काळ्या बाजारात विकल्याचे समोर आले आहे. त्यातील बनाळी, बिळूर,दरिबडची येथे थेट काळ्या बाजारात जाणारे धान्य सापडले आहे.त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत.त्याशिवाय संख,करजगी,भिवर्गीसह अनेक गावातील तक्रारी आहेत.तरीही जतचे पुरवठा अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.त्यासाठी त्यांना धान्य दुकानदाराकडून आर्थिक लाभ होत आहे.
आंवढीतील धान्य दुकानदाराला थेट जतचे पुरवठा अधिकारी पाठिशी घालत आहेत.आर्थिक लाभापोटी त्यांनी इतका मोठ्या प्रमाणात बेकायदा धान्य सापडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही.या सर्व प्रकारातील गौडबंगाल बाहेर काढण्यासाठी श्री.गोठणेकर यांची त्रयस्थ अधिकारी नेमणूक चौकशी करावी,जत तालुक्यातील धान्याच्या भष्ट्र कारभारला जतचे पुरवठा अधिकारी श्री.गोठणेकर जबाबदार असून त्यांना बडतर्क करावे.तरचंं तालुक्यातील धान्याचा काळाबाजार रोकता येणार आहे.