ऊसाची धोकादायक वाहतूक | नियमांची पायमल्ली,अन्य वाहनचालकांच्या जीवाला धोका

0जत,प्रतिनिधी : या वर्षीच्या गळीत हंगामाला आता धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. शहराबरोबरच ऊस पट्ट्यातील प्रत्येक रस्त्यांवर ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, बहुसंख्य वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याचे ही वाहतूक जीवघेणी ठरू लागली आहे. याकडे पोलिस,तालुुुका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 


प्रत्येक वर्षी गळीत हंगाम सुरू झाला की, वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर येतो. नियमांची पायमल्ली करुन सुरू असणारी वाहतूक अन्य वाहनचालकांच्या  जीवावर उठते. विशेषतः रात्रीच्यावेळी ऊस भरलेले ट्रॅक्टर रस्त्यावर बेधडकपणे उभे केला जात  आहेत. यातील अनेक वाहनांना रिफ्लेक्टर बसविलेला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे  ट्रॅक्टर, बैलगाडीला धडकून जीवघेणी अपघाताची मालिका सुरू झाली  आहे. गंभीर बाब म्हणजे अनेक ट्रॅक्टरवर चालक शिकाऊ असल्याचे धक्कादायक चित्र आहे.  
गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येक वर्षी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते. आजपर्यंत ऊस वाहनांना धडकून  शेकडो  जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे. ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना  शासनाकडून नियमावली घालून देण्यात आली आहे.  मात्र,  नियम धाब्यावर  बसवून  ट्रॅक्टर चालक क्षमतेपेक्षा अधिक आडवेतिडवे ऊस भरतात. नफा कमावण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो.  हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत असल्याचे चित्र आहे. Rate Card

केवळ एका लाईटवरच वाहने धावतात
ट्रॅक्टरला स्वतंत्रपणे ट्रॉली जोडण्यात येते. तयामुळे त्यांना इंडिकेटर नसतो. त्याचबरोबर रिफ्लेक्टरदेखील वापरण्यात येत नाहीत. केवळ  एका लाईटवरच ट्रॅक्टरचालक बेलगामपणेे ट्रॅक्टर रेमटत  असतात. त्यातून अपघात घडून अनेकांचे बळी गेल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. दिवसभर आणि रात्री-अपरात्री ऊस वाहतूक सुरू असते. वाहनचालक अनेकवेळा रस्त्याकडेला उसाने भरलेले ट्रॅक्टर लावतात. अशा ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना धडक बसून जीवघेणे अपघात होत आहेत. अजून दोनअडीच  महिने गळीत हंगाम चालणार आहे. त्यामुळे धोकादायक पद्धतीने सुरू असणार्‍या वाहतुकीस  तातडीने पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.  


बेफिकिरिपणे सुरू असणारी ऊस वाहतूक हा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ऊस वाहतूक करणार्‍या वाहनाच्या चारही बाजूंनी रिफ्लेक्टर लावणे अत्यावश्यक आहे. रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्यावेळी वाहन दिसत नसल्याने अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी वाहतूक करणार्‍या बहुसंख्य ट्रॅक्टरमध्ये कर्णकर्कश स्पीकर लावून वाहतूक सुरू असते.  गाणी लावून रस्त्याच्या मधूनच ही वाहने सुसाट वेगाने जातात. यातून पाठीमागून येेणार्‍या वाहनांनी कितीही हॉर्न वाजविले तरीही ते ट्रॅक्टरचालक रस्ता देत नाहीत. त्यामुळे अपघातास निमत्रंण मिळत आहे. कर्णकर्कश गाणी लावून सुसाट वेगाने जाणार्‍या ट्रॅक्टरवर कधी कारवाई होणार, असा सवाल वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. जत-डफळापूर ऊस भरलेल्या ट्रँक्टरमुळे वळणावरही मोठा धोका निर्माण झाला आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.