आनंदमय उत्सव

0
3



दीपावली हा उत्सव आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्त्वाचा उत्सव आहे. तेजस या तत्त्वाची उपासना हे या उत्सवाचे मूलसूत्र. त्या तत्त्वात माणसाला आदिमकाली देवत्वाचा साक्षात्कार झाला. इतर पंचमहाभूतांप्रमाणेच या तत्त्वाचीही संहारक आणि उपकारक अशी दोन रूपे मानवाला दिसली. दिसेल ते स्वाहा करणारे वणव्यासारखे अग्निरूप हे त्या तत्त्वाचे संहारक रूप, तर आपणास ऊर्जा आणि प्रकाश देणारे दीपरूप हे उपकारक आणि विधायक रूप. या दीपरूपाची उपासना या सणामध्ये केली जाते. दीपपूजन, दीपदान आणि दिव्यांची आरास असे या उत्सवाचे रूप आहे.तशी आपली संस्कृतीच मूलतः दीपपूजक असल्याचे दिसून येते. आपल्या देवघरात नंदादीप असतो. तुळशीसमोर सुवासिनी नेमाने दिवा लावतात. 








लग्नसमारंभात करवलीच्या हाती रोवळीत दिवा असतो. त्याच समारंभात ऐरणीदान विधीमध्ये पिठाचे दिवे असतात आणि वधुवरांना सुवासिनींकडून दिव्यांच्या आरतीने ओवाळले जाते. मंगळागौरीच्या व्रतामध्येही दिवे असतात. अवसेला पिठाच्या दिव्यांची पूजा करतात. कोणत्याही मंगल प्रसंगी स्थापितदीप हा साक्षीभूत असतो. आपण एखाद्या प्रिय वा महनीय व्यक्तीचे स्वागतही आरती ओवाळून करतो.

जरी दीपपूजनाचे आपणास नावीन्य नसले तरी दीपावली हा मात्र आपला खास दीपोत्सव आहे. या दीपावलीची सुरुवात कशी झाली असावी? अनेक उपपत्ती मांडल्या जातात, पण एक अधिक तर्कशुद्ध वाटते. आर्यांचे निवासस्थान उत्तर ध्रुवाजवळ होते त्याकाळात दिवाळीची सुरुवात झाली असे म्हटले जाते. ‘सुखं हि दुःखान्यनुभूय शोभते|’ दुःख अनुभविल्यानंतर जर सुख प्राप्त झाले तर त्याचे अप्रूप असते. कल्पना करा, सहा महिन्यांची ध्रुवीय रात्र लांबलचक आणि कंटाळवाणी असेल, ती संपून आता दीर्घ दिवसाची सुरुवात होणार आहे ही कल्पनाच किती उत्साहवर्धक असेल! दक्षिणायनातील दीर्घ रात्रीनंतर उत्तरायणरूपी नव्या दिवसाचा उषःकाल म्हणजेच दिवाळीचा काळ होय.






 त्याच्या स्वागतासाठीच दीपावलीचा आनंदमय उत्सव सुरू झाला असावा हे आपणास पटते. विविध घटनांनी या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. श्रीरामप्रभू चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला आले ते त्याच काळात. बलाढ्य असुरराजा बळी याच्या पारिपत्यासाठी भगवान विष्णूनी वामनावतार घेतला तोही याच काळात. तसेच जुलमी नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने लोकांना भयमुक्त केले तेही याच काळात अशा पुराणकथा आपणास आढळतात.
हा दीपावली उत्सव प्राचीन काळापासून प्रचलित आहे याचे अन्य साहित्यिक पुरावेही आढळतात. वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये ‘यक्षरात्री’ नामक उत्सवाचा उल्लेख आहे. नीलमतपुराणात ‘दीपामाला उत्सवा’चा उल्लेख आढळतो. ‘यशस्तिलक’चम्पूमध्येही दीपोत्सवाचे वर्णन आढळते. तात्पर्य, दीपावलीच्या उत्सवाची परंपरा फार प्राचीन आहे.
खरे तर दसर्‍याच्या दुसर्‍याच दिवसापासून दीपावलीचे वेध लागतात. त्या दिवसापासून म्हणजेच आश्‍विन शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत घरासमोर उंच खांब उभारून आकाशदीप त्यावर लावावा असे शास्त्रविधान आहे. म्हणजे तेव्हापासूनच दिवाळी सुरू होते! अर्थात प्रत्यक्षात दीपावली उत्सव चारपाच दिवसांचा असतो. म्हणजे धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा (पाडवा) आणि यमद्वितीया म्हणजे भाऊबीज इतकी दीपावली उत्सवाची व्याप्ती असते.






आश्‍विन वद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. पायसाचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी यमदीपदानाचाही विधी आहे. याची एक कथा आहे. यमराजाने आपल्या दूतांना एकदा विचारले, ‘मनुष्याचे प्राण हरण करताना तुम्हाला दुःख होत नाही का?’ त्यांनी सांगितले की दुःख होतेच! त्यांनी हेमराज नामक राजाच्या मुलाच्या अपमृत्यूची आणि त्यावेळी झालेल्या दुःखाची कबुली दिली आणि असे होऊ नये यासाठी उपाय विचारला. यमराज म्हणाले, ‘धनत्रयोदशीच्या दिवशी व्रत करून जो यमदीपदान करील त्याला अपमृत्यू येणार नाही.’ तेव्हापासून या प्रथेची सुरुवात झाली. आयुर्वेदाचा प्रणेता वैद्यराज धन्वंतरी याचा जन्म या दिवशी झाला. त्यामुळे त्याची जयंती साजरी करून दीर्घायुष्य आणि अपमृत्यूपासून सुटकेसाठी प्रार्थना केली जाते.





नरकचतुर्दशी हा दिवाळीचा दुसरा दिवस. या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगाला तेल लावून (अभ्यंग) उष्णोदकाने स्नान केले जाते. आघाडा वनस्पतीने अंगावर मार्जन करायचे असते. त्यानंतर यमराजाची पूजा करून जलांजली दिली जाते. दुपारी ब्राह्मणभोजन, वस्त्रदान, रात्री शिवपूजन आणि नक्तभोजन असे विधी सांगितले आहेत. या दिवशी श्रीकृष्णाने प्राग्ज्योतिषपुराचा (आसाम) राजा नरकासुर याचा वध केला. भूदेवीकडून वैष्णवास्त्र प्राप्त झाल्यामुळे तो उन्मत्त झाला होता. अनेक राजे आणि सोळा हजार कुमारिकांना त्यांने बंदिवासात टाकले होते. त्याला मारून श्रीकृष्णाने सर्व राजांची आणि सोळा हजार कुमारिकांची सुटका केली. इतकेच नव्हे तर त्या कुमारिकांशी विवाह करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही प्राप्त करून दिली. मरताना पश्‍चात्तापदग्ध नरकासुराने वर मागितला तेव्हा ‘आजच्या दिवशी मंगलस्नान करून जो माझे स्मरण करील तो दुःखमुक्त होईल’ असा वरही त्याला दिला. तेव्हापासून लोक या दिवशी पहाटे मंगलस्नान करून आनंदोत्सव साजरा करू लागले. गोव्यात स्नानानंतर नरकासुराचे प्रतीक म्हणून ‘कारीट’ नावाचे कडू फळ चिरडले जाते.





दीपावलीचा तिसरा दिवस अमावास्येचा. या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. प्रातःकाली मंगलस्नान, दुपारी ‘पार्वणश्राद्ध’ विधी आणि प्रदोषकाली लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करण्यात येते. त्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा पुराणात आहे. एखाद्या चौरंगावर अष्टदल कमळ अथवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीची स्थापना करतात. जवळच कुबेराची मूर्ती ठेवतात. सुवासिक दुधाचा, खव्याचा तसेच धने, गूळ, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. चूड घेऊन पितरांना मार्गदर्शन केले जाते. ब्राह्मण आणि इतर क्षुधित यांना भोजन देतात. रात्री जागरण करून मध्यरात्री ‘दिमडी’ वाजवून ‘अलक्ष्मी’ला (अवदसेला) हाकलून लावण्याची काही ठिकाणी प्रथा आहे.
पुराणात सांगितले आहे की या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करून निवासयोग्य स्थान शोधते आणि जिथे स्वच्छता, रसिकता आणि कर्तव्यदक्षता, चारित्र्य आढळते तिथे ती वास करते. या वर्णनातील संदेश महत्त्वाचा आहे. लक्ष्मीपूजन व्यापारीवर्गामध्ये विशेष उत्साहाने करण्यात आलेले दिसून येते.






कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा चौथा दिवस आहे. या दिवशी विक्रमसंवत सुरू झाला. व्यापार्‍यांचे नवे वर्ष या दिवशी सुरू होते. या दिवशी वामनावतारात श्रीविष्णूने बळीला पाताळात दडपले ती कथा अशी आहे-प्राचीन काळी प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र बळी नावाचा बलाढ्य असुर राजा होता. त्याने सर्व पृथ्वी जिंकलीच, परंतु लक्ष्मीसह सर्व देवांना बंदिवासात टाकले. इंद्राच्या प्रार्थनेवरून विष्णूने अदितीच्या पोटी वामन रूपाने अवतार घेतला. त्याने बळीच्या यज्ञप्रसंगी यज्ञमंडपात जाऊन तीन पावले भूमीचे दान मागितले. बळीने त्रिपाद भूमी दान दिली. त्यावेळी वामनाचा हेतू ओळखून दैत्यगुरू शुक्राचार्य भुंग्याच्या रूपाने झारीच्या तोंडाशी राहिले. वामनाने दर्भ टोचून अडथळा दूर केला त्यात शुक्राचार्यांचा एक डोळाही फुटला आणि मग झारीतून पाणी सोडून बळीने दान दिले. (‘झारीतील शुक्राचार्य’ ही म्हण या प्रसंगावरून आली.) वामनाने दोन पावलांत पृथ्वी आणि स्वर्ग व्यापला. ‘तिसरे पाऊल कुठे ठेवू’ असे त्याने बळीला विचारले. तेव्हा बळीने मस्तक नमवून ‘यावर ठेवा’ असे सांगितले. वामनाने त्याच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले आणि लक्ष्मीसहित देवांची सुटका केली अशी कथा आहे. बळी हा असुर असला तरी न्यायी आणि सत्प्रवृत्त राजा होता. त्याला श्रीविष्णूने वरही दिला की ‘या दिवशी जो यमाप्रीत्यर्थ दीपदान करील त्याच्या घरी लक्ष्मीचे निरंतर वास्तव्य राहील.’







 तेव्हापासून हा प्रतिपदेचा दिवस बळीचा मानून लोक त्याची पूजा करू लागले आणि आनंदोत्सव साजरा करू लागले. ऐतिहासिक दृष्टीने या कथेचा अर्थ असा की आर्येतर राजा बळी याचा भृगुकच्छामध्ये पराभव झाल्यानंतर त्याने सप्तपाताळापैकी सुतल येथे म्हणजे केरळमध्ये राज्य स्थापन केले. या सत्त्वसंपन्न न्यायी राजाला आजही मान दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करांगुळीवर उचलला या कथेचा या दिवसाशी संबंध आहे. या दिवशी गोवर्धनपूजा केली जाते. उत्तर भारतात ‘अन्नकुट’ विधी साजरा होतो. श्रीकृष्णाला विविध पक्वान्नांचा नैवेद्य दाखवून प्रसादग्रहण केले जाते. ‘गुरांचा पाडवा’ही या दिवशी साजरा होतो. गुरांना सजविले जाते आणि ओवाळलेही जाते.
यमद्वितीया हा दिवाळीचा पाचवा दिवस. वस्तुतः दिवाळीहून वेगळा असूनही सलग येत असल्याने त्याचा दिवाळीत समावेश होतो. बहिणीने या दिवशी भावाला ओवाळायचे असते आणि भावाने प्रेमाने तिला भाऊबिजेची भेट द्यायची असते. 






या दिवशी आपण साजरी करीत असलेली दीपावली पुरी होते. परंतु दीपावलीचे वातावरण त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालू असते. त्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराची तीन पुरे जाळून त्याचा वध केला आणि जगाला त्रासमुक्त केले. त्याचे स्मरण म्हणून त्रिपुर नावाचा दीपस्तंभ पाजळला जातो. अनेक ठिकाणी दीपाराधना साजरी केली जाते. दीपदान केले जाते. गोव्यात साखळी येथे विठ्ठल मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव थाटात साजरा होतो. दीपाराधना आणि नौकास्पर्धाही होते. म्हणजे आम्हा गोवेकरांची दिवाळी ही त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत साजरी होते. संपूर्ण भारतभर दीपावलीचा उत्सव थोड्याफार फरकाने असाच उत्साहपूर्ण रीतीने साजरा होतो. दीपाराधना, दिव्यांच्या रोषणाईने आनंद व्यक्त करणे, शुभसंकल्प आणि शुभकामना करणे, समृद्धीची आकांक्षा ठेवणे असे या दीपावलीचे स्वरूप आहे.




मच्छिंद्र ऐनापुरे,जत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here