जत तालुक्यातील रस्ते काटेरी झुडपांच्या विळख्यात ! | संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष;अपघात वाढले

0



सोन्याळ,वार्ताहर : जत तालुक्‍यातील महत्वाचा राज्यमार्ग असलेला उमदी ते जत, उमदी ते कोंतेवबोबलादसह, बेळोंडगी ते बोर्गी, करजगी ते भिवर्गी, उटगी ते बेळोंडगी-हळ्ळी, जाडरबोबलाद-सोन्याळ,अंकलगी-संख,माडग्याळ यासह एकमेकांना जोडणाऱ्या सर्वच गावांच्या मार्गाची संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या रस्त्यावर खड्याबरोबरच मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांचा उपद्रव वाढल्याने अनेक मार्ग काटेरी झुडपांच्या विळख्यात सापडले असून, या रस्त्यावरील धोकादायक काटेरी झुडपे काढून साईडपट्ट्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली 









आहे.एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना रस्तेही धोकादायक बनत असल्याने प्रवाशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

तालुक्‍यातील एकमेकांना जोडल्या गेलेल्या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांची संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.नागरिक, शेतकरी व्यवसायिक नागरिक दळणवळणासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात; परंतु संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सध्या विविध रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.उमदी, संख, माडग्याळ, जाडरबोबलाद,  कोंतेवबोबलाद येथून जतकडे जाणार्‍या डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांनी वेढा दिल्याने अनेक रस्ते प्रवासासाठी धोकादायक झाले आहे. 









परिणामी, या मार्गावर अपघातजन्य स्थिती निर्माण झाल्याने ही काटेरी झुडपे काढावीत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून पुढे आली आहे. उमदी ते जत या 52 किमी आणि उमदी ते चडचण हद्दीपर्यंत 6 किलोमीटर रस्त्याचे दुपदरी व याच रस्त्यावर काही ठिकाणी पूर्वी असलेल्या दुपदरी रस्त्यावर नव्याने डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली दीड वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणार्‍या गटारचार्‍या अगदी घासून रस्त्यालगत खोदल्याने हा रस्ता मार्ग अरुंद झाला आहे. यातच आणखी भर म्हणून या गटार चार्‍यांमध्ये मोठ्या संख्येने काटेरी झुडपे व इतर झाडे वाढल्याने प्रवासासाठी हा मार्ग आणखीच बिकट झाला आहे. 





Rate Card







शिवाय दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्यावर काटेरी झुडपाबरोबरच गाजरगवत व इतर वनस्पतींची उगवण झाल्याने आत्ता हा रस्ता अतिशय खराब व अरुंद झाला आहे. साईडपट्ट्या गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात अडचणी येत आहेत.

या मार्गावर अनेक वेडीवाकडी वळणे असल्याने या वळणांवर किरकोळ अपघात घडले आहेत.या रस्त्यावरून परिसरातील प्रवासी कामानिमित्त दररोज प्रवास करतात.तसेच इतर जड वाहतुकीची वाहनेही वेगाने जातात. अलीकडच्या काही वर्षांत जत तालुक्यातील अनेक गावासाठी नव्यानेच डांबरीकरण रस्ते करण्यात आले आहे. डांबरीकरण होण्यापूर्वी या रस्त्याच्या देखरेखीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी क्वचितच येत असत. आता मात्र कोरोनाच्या नावाखाली एकही कर्मचारी इकडे  फिरकत नसल्याने रस्त्याच्या नादुरुतीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने तालुक्यातील सर्वच मार्गावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी वेळीच खबरदारी घेऊन प्रवासासाठी अडचण ठरणारी काटेरी झुडपे काढावीत, अशी मागणी ग्रामस्थ, विद्यार्थी व शेतकर्‍यांकडून होत आहे.









काही रस्त्याचा असणारे डांबरीकरण सध्या पूर्णपणे उघडले असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या रस्त्यावर काटेरी झुडपांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव झाला आहे. या रस्त्याला काटेरी झुडपांचा विळखा पडल्याने रस्त्यात काटेरी झुडपे की काटेरी झुडपात रस्ता असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे. या रस्त्यावर वाढलेल्या मोठ्या प्रमाणातील काटेरी झुडपामुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले असून संबंधित प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी वाढत आहे.





Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.