अतिवृष्टीमुळे खरीप फेल तर रब्बी फोल ठरणार? | जमिनींना पाणी लागले,रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या

0सोन्याळ,वार्ताहर : जत तालुक्यात यावर्षी चांगली पिके येऊनही सततच्या व  परतीच्या पावसाने मागास खरीप पिकांची अवस्था मोठी चिंताजनक बनली असतानाच गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी,मका पेरण्या खोळंबल्या आहेत.शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू केली खरी परंतु बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाने लावलेली हजेरी रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी धोक्‍याची घंटा ठरली आहे. 

सोमवार दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतांत लवकर वाफसा येणार नसल्याने येथील शेतकऱ्यांची पंचाईत होणार आहे. परिणामी,असाच पाऊस पडत राहिल्यास रब्बी ज्वारीची पेरणी होण्यास विलंब होऊन फोल ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जत तालुक्यात अनेक ठिकाणी चार-पाच दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने वाफसा सोडाच, परंतु आहे ती पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधारेमुळे काही शेतकऱ्यांनी काढलेल्या बाजरीच्या कणसासह गंजीचे देखील नुकसान होण्याची शक्‍यता आहे. 

Rate Card


 पेरणीचा हंगाम लांबत गेल्यानंतर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र व उत्पादन वाढल्यास मुबलक चारा उपलब्ध होतो. मात्र, ज्वारीची पेरणी लांबणार असल्यामुळे चाराटंचाई निर्माण होण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. या परिस्थितीचा विचार करता खरीप पाठोपाठ रब्बी हंगामातील उत्पादन कमी झाल्यास त्याचा गंभीर परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल उडून जाण्याच्या भीतीने नुकतीच रब्बीतील ज्वारीची पेरणी केली होती. मात्र, या पावसाने नुकत्याच पेरलेल्या ज्वारीच्या क्षेत्रात पाणी थांबल्याने उगवून आलेले अंकुर कुजू लागले आहे. परिणामी, पीक उगवण्याची खात्री नसल्याने दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांवर येणार आहे.याशिवाय परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे द्राक्षासह खरिपातील भूईमूग,तूर,सोयाबीन,यासह कडधान्ये मूग, चवळी, उडीद अशी पिके चांगली येऊनही पावसाच्या संततधारेमुळे वाया गेली आहे.


 तर रब्बी पिकांनाही ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.तसेच रब्बीतील शाळू, हरभरा, गहू अशा पेरणीसाठी राखीव ठेवलेल्या शेतामध्ये पावसामुळे तणांचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तर पावसाची उघडीप नसल्याने तण काढणे मुश्किलीचे बनले आहे. वाफसा नसल्याने रब्बी हंगाम पुढे जात आहे. त्यामुळे खरीप फेल, तर रब्बी हंगामही फोल जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  गेल्या चार वर्षांपासून निसर्गाचा समतोल बिघडल्याने शेतीवर प्रामुख्याने परिणाम होत आहे.  शेतकरी वर्ग बदलत्या ऋतुमानामुळे अतिशय चिंतेत आहे. पावसाची संततधार, अतिवृष्टी, कधीकधी रिमझीम पाऊस अशा चित्रविचित्र हवामानातील बदलाची ग्रामीण भागात चर्चा होत आहे.


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.