एका दृष्टीक्षेपात बिहार निवडणूक

0

 विधानसभा 243 सदस्य संख्येची आहे. नोव्हेंबरच्या 29 तारखेला बिहार विधानसभेची मुदत संपत आहे. येथील निवडणूक तीन टप्प्यात होत असून मतदानाचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबर तर दुसरा आणि तिसरा टप्पा अनुक्रमे 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी होत आहे. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 18 लाख मतदार आहेत. त्यात 3 कोटी 79 लाख पुरुष मतदार, तर 3 कोटी 39 लाख महिला मतदार आहेत. सत्तेवर येण्यासाठी राजकीय पक्षांना 122 चा आकडा पार करावा लागणार आहे.1990 नंतरच्या भारतीय राजकीय प्रक्रियेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून आघाडी राजकारण (युती किंवा संयुक्त आघाडी) ही संकल्पना पुढे आली. बहुपक्षीय स्पर्धेतून केंद्रामध्ये आणि काही घटकराज्यांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेनासे झाले आणि राजकीय अपरिहार्यतेतून निवडणूकपूर्व किंवा निवडणुकोत्तर आघाड्या अस्तित्वात येऊ लागल्या.  1990 मध्ये बिहारमध्ये काँग्रेस, जनता दल आणि भाजप यांच्यातील स्पर्धा आकारास आली. मंडलच्या मुद्द्यावर लालू प्रसाद यादव, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, नीतिश कुमार आणि रामविलास पासवान या नेतृत्वाने ओबीसी-दलित-मुस्लीम आघाडीची मोट बांधत काँग्रेसला पराभूत केले.परंतु ओबीसी नेतृत्वाच्या सत्तास्पर्धेतून जनता दलाचे विभाजन झाले आणि बिहारचे राजकारण लालू प्रसाद यादव आणि नीतिश कुमार या दोन ओबीसी नेतृत्वांभोवती फिरू लागले.1990पासून (आणि विशेषतः 2000पासून) बिहारमधील पक्षीय स्पर्धा तीव्र होताना दिसते. 1990नंतर बिहारमध्ये काँग्रेस पुन्हा कधीही सत्तेवर आली नाही आणि इतर पक्षांनाही स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. 1990 ते 2015 यांदरम्यान झालेल्या सात विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांना प्राप्त जागांच्या प्रमाणावरून आणि मतांच्या टक्केवारीवरून बिहारच्या राजकारणात आघाडी आकाराला आली.
1990, 1995 आणि 2000 या तिन्ही विधानसभा निवडणुकांत लालू प्रसाद यादवांना चांगल्या जागा मिळाल्या,पण बहुमतासाठी छोटे पक्ष, डावे पक्ष, बहुजन समाज पार्टी (बसपा), अपक्ष यांचा पाठिंबा घ्यावा लागला. 1995 मध्ये लालूंच्या नेतृत्वाखालील जनता दल आघाडीत माकप, भाकप व झारखंड मोर्चा हे पक्ष सहभागी होते. तर समता पक्षासोबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मा. ले.  (भाकप-माले)  हा पक्ष होता. 1997 मध्ये जदमधून बाहेर पडून लालूंनी राजदची स्थापना केली. तेव्हा अल्पमतातील राबडी देवी सरकारला काँग्रेसचा आणि डाव्या पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला.  फेब्रुवारी 2005 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजदसोबत भाकप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व राष्ट्रवादी काँग्रेस तर ऑक्टोबर 2005 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकप हे पक्ष होते. 2005मध्ये स्पष्ट बहुमताअभावी राजकीय अस्थिरता निर्माण होऊन नऊ महिन्यांत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या. 2005 मध्ये आणि 2010 मध्ये नीतिश कुमारांनी भाजपच्या सोबत सरकार तयार केले. पण भाजपशी मतभेद झाल्याने 2013 मध्ये नीतिश कुमारांनी भाजपची साथ सोडली. 2015 च्या निवडणूकीत त्यांंनी लालूंशी युती केली. राजद, जद(यू) आणि काँग्रेस आघाडी यांनी स्पष्ट बहुमत मिळवले व सरकार स्थापन केले परंतु 20 महिन्यांतच राजदशी युती तोडून नीतिश कुमारांनी पुन्हा भाजपशी युती केली. राजद आणि जद(यू) यांच्यातील जागांचा आणि मतांचा विचार केला तर 2005 पासून राजदच्या जागा आणि मतांची टक्केवारी कमी होताना तर जद(यू)च्या जागा व मते वाढताना दिसतात. त्यामुळे 2005 पासून आणि 2020 मध्येही मुख्य स्पर्धा राजद व जद(यू) यांच्यामध्ये दिसून येते. राजद व जद(यू) यांच्या सत्तासंघर्षात राष्ट्रीय पक्ष असलेले काँग्रेस आणि भाजप हे राज्यात दुय्यम भूमिका घेताना दिसतात. 1995 पासून काँग्रेस अस्तित्व टिकवण्याच्या तर भाजप विस्ताराच्या प्रयत्नात दिसतात. 1990 पासून काँग्रेसच्या जागा व मते कमी होताना तर भाजपच्या जागा व मते मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. बिहारमधील राजकीय पक्षांना मिळणारा सामाजिक पाठिंबा पाहिला तर आघाड्यांच्या राजकारणाची अपरिहार्यता स्पष्ट होते. Rate Card

याठिकाणी नेतृत्वाच्या सत्तास्पर्धेतून ज्याप्रमाणे नेतृत्व विविध पक्षांत विभाजित होत गेले तशी जातींची मतेही विभाजित होत गेली. मात्र जातिअस्मितेचा मुद्दा आग्रही झाला. 1990 मधल्या व 1995 मधल्या निवडणुकांत जनता दलासोबत असलेला ओबीसी समाज नंतर राजद व जद(यू) यांच्यात आणि इतर छोट्या पक्षांत विभागला गेला. राजदमागे यादव व मुस्लीम तर जद(यू) यांच्यामागे कुर्मी व कोयरी आणि लोजपा व हिंदुस्तानी आवामी मोर्चा (हम) यांच्यामागे दलित समाज उभा राहिलेला दिसतो. सवर्ण समाज भाजपमागे एकवटलेला दिसतो.
2015 मध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जद (यू) ने लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलसोबत निवडणूक लढवली होती. तेव्हा जद(यू), राजद, काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्ष यांचे महागठबंधन आकाराला आले होते. नितीशकुमार मुख्यमंत्री बनले तर लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री बनले. 2017 मध्ये नितीशकुमार यांनी राजदपासून गठबंधन तोडले आणि भाजपला सोबत सरकार बनवले.तेव्हा भाजपचे 53 आमदार होते. काँग्रेसने मागील निवडणूक राजद,जद(यू) आणि अन्य राजकीय पक्षांच्या महागठबंधनच्या माध्यमातून लढवली होती. यावेळी त्यांना 27 जागा मिळाल्या होत्या.भाजपाच्या सहयोगी लोकजनशक्ती पार्टीने 2 जागा जिंकल्या होत्या.
2020 मधली बिहारची विधानसभा निवडणूक प्रमुख दोन आघाड्यांदरम्यान होत आहे. लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनमध्ये राजदसोबत काँग्रेस, माकप, भाकप, माकप माले, झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष आहेत तर जद(यू)सोबत भाजप आणि जीतनराम मांझी यांचा हम पक्ष नीतिश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये समाविष्ट आहेत.एनडीएचा घटकपक्ष असलेला रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पार्टी हा पक्ष या वेळी जागावाटपामुळे आणि नीतिश कुमारांच्या भूमिकांमुळे आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरला आहे. या दोन प्रमुख आघाड्यांशिवाय उपेंद्र कुशवाहा यांच्या नेतृत्वाखाली आरएलएसपी, बसपा, एमआयएम, जनवादी पार्टी यांनी एकत्रित आघाडी बांधली आहे.सत्तेत परतण्याचा प्रयत्न करणारा राजद मागील निवडणुकीत महागठबंधनमध्ये सामील होता. या महागठबंधनमध्ये राजदसोबत डाव्या आघाडीचे पक्ष देखील सामील झाले आहेत. काँग्रेस आधीपासूनच सोबत आहे. या महागठबंधन मध्ये राजद 144 जागांवर, काँगेस 70 जागा आणि डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढवत आहेत. एनडीए आघाडीमध्ये भाजप, जद(यू) व्यतिरिक्त व्हीआयपीचे मुकेश साहनी, हमचे जितन राम मांझीदेखील सामील आहेत. रामविलास पासवान यांचे नुकतेच निधन झाले, त्यांची लोजपा याखेपेला एनडीएमध्ये सामील झाली नाही. या आघाडीतून जद (यू) 122 जागांवर तर भाजप 121 जागांवर निवडणूक लढवत आहेत. जद (यू) ने आपल्या खात्यातील सात जागा जितन राम मांझी यांच्या हम पार्टीला दिल्या आहेत. भाजपनेही आपल्या खात्यातल्या 11 जागा मुकेश साहनी यांच्या व्हीआयपीला देऊन टाकल्या आहेत. याशिवाय रालोसपाचे उपेंद्र कुशवाह, बहुजन समाजवादी पार्टीच्या मायावती, एआयएमएआयएमचे असदुद्दीन ओवैसी, जनवादी पार्टी (समाजवादी)चे संजय चौहान आणि सोहेलदेव भारतीय समाज पार्टी या सगळ्यांनी मिळून तिसरी आघाडी साधली आहे. त्याचबरोबर
जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी प्रगतीशील लोकतांत्रिक आघाडी म्हणजेच पीडीए बनवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये चंद्रशेखर आजाद  अध्यक्ष असलेली आजाद समाज पार्टी, एमके फैजी यांच्या नेतृत्वाखालील सोशल डेमोक्रेटिक पार्टी आॅफ इंडिया म्हणजेच एसडीपीआय आणि  बीपीएल मातंगची बहुजन मुक्ति पार्टी सामील आहे.  इंडियन यूनियन मुसलिम लीग आता या आघाडीचा हिस्सा राहिलेली नाही. 
महागठबंधनच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले  तेजस्वी यादव राघोपुर येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांचे मोठे बंधू तेज प्रताप हसनपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांचा पारंपरिक महुआ हा मतदारसंघ त्यांनी सोडला आहे. एनडीए नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. जद (यू) च्या उमेदवारांमध्ये लालूप्रसाद यांचे व्याही आणि त्यांचे मोठे चिरंजीव तेजप्रताप यांचे सासरे चंद्रिका राय यांची चर्चा जोरात आहे. जद (यू) ने मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणापासून चर्चेत आलेल्या मंजू वर्मा यांना निवडणूक मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीत पुष्पम प्रिया चौधरी हा आणखी एक चेहरा चर्चेत आहे. स्वतःला बिहारच्या मुख्यमंत्री उमेदवार असल्याचे सांगणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी या पाटणातील बांकीपूर आणि मधूबनीच्या बिस्फि विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. यांनी लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे आणि येथे येऊन त्यांनी प्लूरल्स नावाचा पक्ष स्थापन केला आहे.- निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या, उमेदवारांच्या सभांना गर्दी होऊ लागली आहे. साहजिकच येथे कोरोनाची भीती दिसून येत नाही. कोरोना काळात होणारी ही पहिलीच निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. 

मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

7038121012

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.