नारीचा सन्मान

0विविध वस्रालंकारांनी, आभूषणांनी नटलेली स्री म्हणजे सौंदर्य मुर्ती किंवा देवीचे रुप असे आपल्या मनावर पूर्वापार बिंबलेले आहे. पुरुषहि पूर्वी विविध आभूषणे परिधान करत. नजरेला छान दिसते म्हणून कि सवयीचा परिणाम, कारण काहिहि असले तरी चित्रात दाखविलेली स्री असो की देवी, ठाराविक अलंकारात सालंकृत बंदिस्त केलेली दिसतेच. स्रियांची दागिण्यांची आवड ही पूर्वापार चालत आलेली आहे. अलंकारांना सौंदर्याचे प्रतिक मानून त्यातीलच काही अलंकारांना सौभाग्याचे लेणे असल्याचा मान मिळाला. काहि विशिष्ट दागिणे, जसे की, मंगळसूत्र, जोडवे, बांगड्या टिकली हे सौभाग्यवती स्री ने घालणे बंधनकारक ठरले. तेच एखाद्या विधवेने या अलंकारांचा त्याग करावा याचीहि सक्ती केली गेली. कुठलाहि शास्रीय आधार नसलेल्या या वस्तूंचा स्री देहाशी घनिष्ठ संबध निर्माण झाला. आणी याच गोष्टी स्री च्या भावनिकतेशी जोडल्या गेल्या. पुरुषांनी या अलंकारातून अलगद स्वतः ची सुटका करुन घेतली, परंतु स्री मात्र त्यातच गुरफटली गेली. 

        अनेक बंधन झुगारुन स्री शिकली, प्रगती केली. स्वतंत्र विचार करायला शिकली. सोयीनुसार तिने पोषाखात बदल केला, तसे अंगभर दागिने मिरवणं कमी झालं. तरीहि मंगळसूत्र व जोडव्यांच स्थान मात्र आ़बाधितच राहिलं. आजकाल मुली मंगळसूत्राचे अनेक प्रकार वापरु लागल्या आहेत. त्यातील वाट्यांची जागा विविध पदकांनी घेतलीय. तर काळे मन्यांचे रुप हे नावापुरते उरलेत. साखळी वाटावी इतके मंगळसूत्राचे रुपडे बदलले..पण स्थान मात्र आबाधितच राहिले. जिन्स टाँप असो की ड्रेस त्यावर साजेस व रंगसंगती जुळविणारे मंगळसुत्राचे अनेक प्रकार बघायला मिळतात. रात्री झोपेतसुद्धा आम्ही मंगळसूत्र गळ्यातुन काढत नाही अस अभिमानाने सांगणाऱ्या स्रियाही आहेत व सुट्टीच्या दिवशी गळ्यात काहीच न घालणाऱ्या ही आहेतच. पण चारचौघात मात्र विवाहीतेने सौभाग्यालंकार न घालणे ही मोठी चुक समजली जाते. निष्क्रीय पुत्रप्रेमात आंधळी असलेली सासू आपल्या सुस्वभावी व कर्तबगार सुनेचा सगळा चांगुलपणा विसरुन तिचा राग करते, बोलणे टाकते. कारण काय तर? आईच्या नाकर्त्या बबड्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हावी यासाठी तिने मंगळसूत्र काढून टाकले. अस काहीस मराठी मालिकांमाधेहि दाखवताय म्हणजे केवढा पगडा आहे समाजमनावर या सौभाग्यलंकारांचा. स्री ची कर्तबगारी, तिची निष्ठा ,तिचा चांगुलपणा फोल ठरविणार्या कितीतरी गोष्टी आपण सोडायलाच तयार नाहीए.
         एकीकडे देवीचे रुप मानून तिची पूजा करायचि व दुसरीकडे अशा लहानसहान गोष्टी त फक्त तिलाच दोषी ठरवून तिच्या वर आरोप करायचे ही कसली आलीय मानसिकता? मुली व स्रियांवर होणाऱ्या अन्यायामागे असेच निरर्थक विचार व नाकर्त्या मुलांच्या चुकांना पाठीशी घालणारी पालकांची आंधळी पुत्रप्रेम वृत्ती जबाबदार आहे. स्रियांना देवत्व बहाल करुन, वस्रआभूषणांनि नटवून त्यांची पूजा करणे थांबविले पाहिजे. तिला देवी म्हणून नाही तर एक मनुष्य म्हणून जगता आले पाहिजे. यासाठी समाजातील पूर्वापार मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्री कडे भोगवस्तू, अबला किंवा सूडभावनेने न बघता एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचा निर्विवाद स्विकार व्हावा हीच खरी तिची पूजा असेन. प्रत्येक घरातून पुरुष, व मुलांना स्री चा केवळ आदरच नाही तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचे अस्तित्व स्विकारण्याचि सवय लावायला हवी. 
         कोणत्याही पौराणिक , धार्मिक कथा स्री शिवाय पूर्णत्वास गेलेल्या नाहीच. त्यामुळे स्री शिवाय पुरुषांच्या जीवनाचे महत्त्व शून्यावर येऊन ठेपते. जगातील प्रत्येक जीवाचा उगम स्रीनेच झाला आहे. एकीकडे तिच्या दैवी रुपास पुजणे, तर दुसरीकडे असंवेदनशील सामाजिक ,मानसिक , पुरुषी अहंकाराखाली स्री देह चिरडून टाकणे हा विरोधाभास समाजासाठी खूप लाजीरवाना आहे. जेथे स्री आईच्या गर्भात सुरक्षित नाही तेथे ती कोणत्याही वयात, कोणत्याही रुपात सुरक्षित कशी असेन? स्रीयांवर होणारा अत्याचार हा केवळ शारीरिक आकर्षण नसून , सूडभावना , स्रीला तिची जागा दाखविण्याच्या विकृत भावनेचे फलित आहे. 
            यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता/
  अर्थात जेथे स्रियांचा आदर केला जातो तेथे देवाचा निवास असतो. 
           आजची स्री मनातील कल्पना वास्तवात आणणारी, पुरुष प्रधान संस्कृतीतहि स्वतः चे बळकट स्थान निर्माण करणारी, प्रत्येक समस्येला खंबीरपणे सामोरे जाणारी अशी रणरागिणी आहे. परिस्थितीला कंटाळून पुरुष लवकर हतबल होऊन स्वतः ला संपवतो, परंतु स्री आपल्या लेकराबाळांसाठी खंबीरपणे उभी रहाते. 
       फक्त नवरात्री पुरते कुमारीका, सुवासिनी पुजन करुन विविध जोखडात त्यांना अडकवू नका. स्रियांच्याहि नकाराचा अर्थ नाही असाच असतो हे स्विकारण्याची शिकवण समाजात रुजणे गरजेचे आहे. जेव्हा स्री ला गृहीत न धरता तिच्या नकारालाहि महत्त्व प्राप्त होईल व तिचा नकार सरळ मनाने स्विकारण्याची मानसिकता मोकळ्या मनाने पुरुष व समाज स्विकारेल तेव्हा कुठे स्री निर्भिडपणे जगू शकेल . तिला सन्मान प्राप्त होईल. आणी तेव्हा च खरी देवीची पूजा सार्थकी होईल. 

मनिषा चौधरी, नाशिक
9359960429

Rate Card

कोट केलेला मजकूर दर्शवा

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.