बलवडी, करंजे येथून वाहून गेलेल्या दोघांचा अद्याप शोध नाही
तासगाव : खानापूर तालुक्यात रविवारी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. या पावसाने अग्रणी नदीला अक्षरशः महापूर आला. या पुरात तालुक्यातील बलवडी, करंजे व लेंगरे येथील तिघेजण वाहून गेले.यातील लेंगरे येथील मुलाचा मृतदेह सापडला आहे.मात्र बलवडी व करंजे येथील दोघांचा अद्याप शोध लागला नाही. गेल्या चार दिवसांपासून शोधकार्य सुरू आहे.
मात्र अद्याप त्यास यश आले नाही.
या पुरातील पाण्याचा अंदाज न आल्याने लेंगरे येथे एक मुलगा वाहून गेला. त्याचा मृतदेह मिळाला आहे. तर बलवडी येथील गावओढ्यात मल्हारी सुरेश तुपसौंदर्य (वय 27) हा युवक वाहून गेला. हा युवक खानापूरहून गावाकडे निघाला होता. तर वायफळे – करंजे रस्त्यावर करंजेनजीक पुलावरून सिराज बापू मुलाणी (वय 45) हे वाहून गेले.मुलाणी हे आपल्या दुचाकीवरून या पुलावरून जात होते.

मात्र पाण्याच्या वेगामुळे त्यांची दुचाकी कोसळली. दुचाकी वाहून जात असताना ती वाचवण्याचा प्रयत्न मुलाणी यांनी केला. त्यातच त्यांचा पाय घसरला. त्यामुळे दुचाकीसह तेही वाहून गेले. हा सगळा प्रकार ‘कॅमेराबद्ध’ झाला.गेल्या चार दिवसांपासून तुपसौंदर्य व मुलाणी यांचा शोध सुरू आहे. सांगली येथील रेस्क्यू टीम व खानापूर, सावळज औट पोस्ट पोलीस ठाण्यातील पोलिसांनी पूर्ण अग्रणी नदी पालथी घातली आहे. शिवाय सिद्धेवाडी तलाव व अग्रणी नदीची ड्रोन कॅमेराद्वारेही पाहणी केली.मात्र आजतागायत दोघांना शोधण्यात यंत्रणेला यश आले नाही.