कोविड आजारातून बऱ्या होणाऱ्या रुग्णासाठी पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर महत्वाचे ठरणार : जिल्हाधिकारी

0सांगली : कोविड आजारातून बरे झालेल्या काही रूग्णांना पुन्हा काही वेगवेगळे त्रास होऊ शकतात. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना तपासणे व आवश्यक औषधोपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोविड मधून बरे झाल्यानंतर काही त्रास उदभवणाऱ्या रूग्णांना हे सेंटर अतिशय महत्वाचे ठरणार आहे, असे प्रतिप्रादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे पोस्ट कोविड-19 बाह्यरूग्ण विभागाचे उद्घाटन जिल्हाधिकारी  डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी  ते बोलत होते. या प्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षीत, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर मुर्ती, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्ता भोसले आदि उपस्थित होते.


डॉ. चौधरी म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे मार्च पासून डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल म्हणून काम करीत आहे. या ठिकाणी पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर सुरू केले असून आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 30 हजाराहून अधिक रूग्ण कोविड आजारातून बरे झाले आहेत. त्यापैकी कोणालाही काही त्रास होत असल्यास त्यांच्याकरिता सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पोस्ट कोविड ट्रिटमेंट सुरू राहणार आहे. आवश्यकतेनुसार पुढे आणखी दिवसही वाढवू शकतो.

Rate Card

याचा खूप मोठा फायदा रूग्णांना होईल.गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील रूग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. नजीकच्या काळात दसरा, दिवाळी हे सण असल्यामुळे लोकांची हालचाल मोठ्या प्रमाणात होऊन संपर्क वाढून कोरोना संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता आहे. यासाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, वैयक्तिक स्वच्छता या नियमांचे नियमितपणे पालन करण्याबरोबरच संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन करून पोस्ट कोविड-19 बाह्यरूग्ण विभागाची पहाणी करून तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जाणून घेतली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील दाखल रूग्णांना त्यांच्या खाटाजवळ गरम जेवण मिळण्याकरिता प्रा. सर्जेराव गायकवाड व अरूण दांडेकर यांनी 20 (नग) हॉट पॉटचे भांडे रूग्ण आहार विभागास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देणगी स्वरूपात भेट दिले.या प्रसंगी रूग्णालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच कोविड उपचार घेवून बरे झालेले रूग्ण उपस्थित होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.