अटल टनेल बोगदा;आधुनिक काळातील मोठी उपलब्धी
लेह मनालीच्या महामार्गावर रोहतांग खिंडीजवळ बांधलेल्या 9 किलोमीटर लांबीच्या अटल बोगद्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.या बोगद्यामुळे लेह ते मनाली या दोन निसर्ग संपन्न शहरातील अंतर चार तासांनी कमी होणार आहे. हिमालयाच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सुमारे 10 हजार फूट उंचीवर असलेला जगातील सर्वात लांब व उच्च तंत्रज्ञानयुक्त असा हा बोगदा आहे.
लेह ते मनाली हा मार्ग अत्यंत दुर्गम आणि कठीण असा होता.या मार्गाने प्रवास करणे म्हणजे अडथळ्यांची शर्यतच होती. हा महामार्ग दुर्गम अशा डोंगरातून जातो त्यामुळे येथुन प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे असे समजले जात होते त्यामुळे रोहतांग खिंडीजवळ बोगदा बांधण्यात यावा अशी मागणी येथील रहिवासी करीत होते.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या एका सहकाऱ्याने ही मागणी अटलजींच्या कानावर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी लगेच (जून 2002) या भागात भेट देऊन स्थानिक रहिवाश्यांशी चर्चा केली. या भेटीतच त्यांनी रोहतांग बोगद्याची घोषणा केली. वाजपेयी सरकारने या बोगद्याच्या शक्याशक्यतेचा अहवाल तयार करण्याचे काम राईट्स या कंपनीला दिले. अंदाजानुसार या बोगद्याला 5 अब्ज डॉलर खर्च होणार होता व ते पूर्ण होण्यासाठी 7 वर्ष लागणार होती.
पुढे काही कारणाने काम रखडले कंत्राटदार बदलले गेले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली ती मात्र मनमोहन सिंग यांच्या काळात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर या बोगद्याच्या कामाला गती मिळाली. आज बोगद्याच्या रूपाने एक आधुनिक यंत्रणा लेह मनाली मार्गावर उभी राहिली आहे. अग्निशमन, टेलिफोन, इंटरनेट, आपत्कालीन व्यवस्थायुक्त असा हा बोगदा आहे. आणीबाणीच्या वेळी बोगद्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक वाट आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेला, सर्वाधिक लांबीचा व तंत्रज्ञानयुक्त असा हा बोगदा आहे. मूल अंदाजापेक्षा त्याचा खर्च खूप वाढला असला तरी सामरिक दृष्टीने हा बोगदा खूप महत्वपूर्ण असल्याने सरकारने त्याच्या कामात पैशाचा अजिबात विचार केलेला नाही. 12,252 मेट्रिक टन स्टील,1.69 लाख टन सिमेंटचा वापर या बोगद्यासाठी झाला आहे. यावरुन या बोगद्याची भव्यता लक्षात येते. आज इतक्या वर्षाने का होईना हा बोगदा पूर्ण झाल्याने स्थानिक आदिवासी रहिवाशांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली आहे.

स्थानिक रहिवाशांना या बोगद्याचा खूप फायदा होणार आहे. दोन्ही निसर्गसंपन्न शहरांना जोडणारा हा बोगदा असल्याने आता पर्यटक देखील या दोन्ही शहरांना भेटी देतील त्यामुळे या दोन्ही शहरातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. सामरिकदृष्ट्या देखील हा बोगदा खूप महत्वाचा ठरणार आहे. एकूणच हा बोगदा भारतासाठी आधुनिक काळातील मोठी उपलब्धी ठरणार आहे.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
9922546295
