जत,प्रतिनिधी : श्री संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य वैराग्य संपन्न श्री संत सयाजी बागडेबाबा यांची 26 वी पुण्यतिथी सोमवारी मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी भुयार मठ येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज व मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत साधेपणानी साजरी करण्यात आली. दुपारी बारा वाजता श्री संत बागडेबाबा यांचे फुले टाकण्याचा कार्यक्रम निवडक भक्तांच्या उपस्थिती करण्यात आला.
दरवर्षी श्री संत बागडेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनी महाराष्ट्र, कर्नाटक येथून भाविक मोठ्या संख्येने येतात यंदा चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत बागडेबाबा यांची पुण्यतिथी सोहळा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले होते.
त्यानुसार यंदा चिकलगी भुयार येथे 17 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान साधेपणाने धार्मिक, सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले.
एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या जत व मंगळवेढा तालुक्यातील गावांना श्री ची मूर्ती भेट देण्यात आली. वृक्षारोपन, वृक्ष संवर्धन तसेच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या सदस्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. महत्वाचे म्हणजे यावर्षी जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे श्री संत बागडेबाबा यांच्या मंदिराचे काम अवघ्या तीन महिन्यात करून त्याचा लोकार्पण सोहळा साधेपणाने तुकाराम बाबा महाराज यांनी दोन दिवसांपूर्वी पार पाडला.
सोमवारी चिकलगी भुयार मठ येथे श्री संत बागडेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य भाविकांनी पहाटेपासूनच हजेरी लावली. सोशल डिस्टन्सचे पालन करत दुपारी बारा वाजता चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांचे कीर्तन झाले व त्यानंतर फुले टाकण्याचा कार्यक्रम झाला.