सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा अध्यासन केंद्र व अश्वारूढ पुतळ्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि उच्च शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात येत्या ऑक्टोबरमध्ये भूमिपूजन सोहळाही होईल, असे श्री सामंत यांनी आज बैठकीत सांगितले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा व अध्यासन केंद्र संदर्भात शिक्षणमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस, आमदार रोहित पवार, शिक्षण संचालक डॉ. धनराज माने आणि कुलसचिव डॉ. विकास घुटे यांचा सहभाग होता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित स्मारक, अध्यासन केंद्र व पायाभूत सुविधांसंदर्भात धनगर विवेक जागृती अभियानाने 13 ऑगस्टला स्वतंत्र भुमिका घेवून निवेदन दिले होते. अहिल्यादेवींचे स्मारक शासकीय निधीतूनच व्हायला पाहिजे, ही भुमिका घेवून लोकवर्गणी, तसेच स्मारक समितीसंबंधाने कुलगुरूंनी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांची उच्चस्तरिय चौकशीची मागणी केली होती. अहिल्यादेवींसंदर्भात सुरू असलेल्या जातीयवादी विचारांचा निषेध म्हणून ही आग्रही भुमिका घेतली होती. यासंदर्भाने विविध समाजघटकांतून चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या. आज मुंबईत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी बैठक घेवून स्मारक राज्य शासनाच्या निधीतून करणार असल्याचे जाहीर केले आहे. तशी माहिती राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. मंत्री सामंत यांनी ऑक्टोंबरमध्ये स्मारकाचे भुमीपूजन करण्याची घोषणा केली आहे. त्यासोबत अध्यासनाला निधी देण्याचे सुतोवाच केले आहे. राज्य शासनाच्या या घोषणेचे आम्ही स्वागत करत आहोत. स्मारकासंदर्भातील गोष्टींवर आम्ही यापुढील काळातही बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत अहिल्यादेवींची उपेक्षा होवू दिली जाणार नाही, तसेच विद्यापीठाला पक्षीय अड्डा होवू दिला जाणार नाही , असे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे