सध्या कोरोच्या नावाखाली शिक्षकांना अनेक प्रकारच्या ड्युट्या कराव्या लागत आहेत. खरे तर शिक्षकांचे मुख्यकाम हे ज्ञानदान करणे हे आहे. तरी देखील एरव्ही हि असलेल्या अनेक अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकाला कोरोना ड्युटी च्या नावाखाली रेशन दुकान, मद्य विक्री दुकान, चेकपोष्ट अशी अनेक आक्षेपार्ह कामे करावी लागली आहेत. या शिवाय कोरंटाईन झोन असलेल्या गल्ली बोळात दिवसा रात्री १२-१२ तासांची ड्युटी हि शिक्षकांना करावी लागत आहे. यापैकी काही ठिकाण तर अगदी गावांच्या कोपऱ्यात,कुठेतरी गावाबाहेर आहेत. जेथे या शिक्षकांना ऊन, पावसा पासून संरक्षण मिळेल अशी बसण्याची ठिकाण सुद्धा उपलब्ध नाहीत. कुठेतरी कुणाच्या तरी ओट्यावर किंवा झाडाखाली बसून आपले कर्तव्य बजावत आहेत.
मोबाइल दिला नाही,म्हणून शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या |
नुकतीच एका कौरंटाईन झोन वर रात्रीची बारा तासांची ड्युटी करणाऱ्या एकट्या शिक्षकाला विषारी कोबरा नागाचा सामना करावा लागल्याची बातमी वाचली. जेथे बसायला धड जागा नाही अशा गावाबाहेरील ठिकाणावर असे प्रसंग घडल्यास उभ्याने रात्र काढण्याची वेळ विनाकारण शिक्षकांवर येत आहे. जणू शिक्षक हा दैवी शक्ती लाभलेला दिव्य अवतार आहे! असा जणू सर्वांचा भ्रम झालाय कि काय असे वाटू लागले आहे. “मुके बिचारे कुणीही हाका” अशी अवस्था शिक्षकांची करू पाहताय कि काय? प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या या शिक्षकांना कोणतेही संरक्षण देण्याची खबरदारी कुणीच घ्यायला तयार नाही. येणार जाणारांची नोंद करण्याचे रजिष्टर शिक्षकाच्या हाती देऊन प्रत्येकजण जवाबदारी झटकून मोकळा होत आहे. आणि शिक्षक मात्र कामाशी एकनिष्ठ राहून आपले कर्तव्य बजावत असतो नेहमीप्रमाणे.