आईसोबत झालेल्या वादानंतर उचलले पाऊल : गावात दोन दिवसांत दुसरी आत्महत्या
वायफळे : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील पिराच्या शेतातील एका विहिरीत सरस्वती नवनाथ हंकारे (वय 20) या युवतीने उडी घेऊन आत्महत्या केली. तिची ओळख पटली आहे. आज ता.14 सकाळी आईसोबत झालेल्या वादानंतर तिने हे कृत्य केल्याची चर्चा घटनास्थळी आहे. गावात दोन दिवसात दोघांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, सरस्वती हीचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. काही महिन्यांच्या संसारानंतर तिची आणि पतीची सोडचिठ्ठी झाली होती.त्यानंतर ती आपल्या माहेरी वायफळे येथेच होती.
घरात आईसोबत तिचा किरकोळ कारणावरून वाद होत होता. आज सकाळीही तिचा आणि आईचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. वादानंतर सरस्वती पिराच्या शेतात गेली. तेथील एका विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली.
दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान तेथील नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. सरस्वतीचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याने एक किंव्हा दोन दिवसांपूर्वी तिने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा घटनास्थळी होती.मात्र तिने आज सकाळी आईसोबत झालेल्या वादानंतरच आत्महत्या केल्याचे नंतर निदर्शनास आले.
आत्महत्येची माहिती समजल्यानंतर गावातील लोकांनी विहिरीवर गर्दी केली आहे. सरस्वतीचा मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.गावात एक दिवसापूर्वीच वैभव बबन नलवडे या युवकाने आत्महत्या केली होती. तर आज सरस्वतीने आत्महत्या केली. गावात दोन दिवसात दोन वेगवेगळ्या आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
वायफळे युवतीने आत्महत्या केलेल्या विहिरीशेजारी बघ्याची गर्दी झाली होती.