सांगली : एका गुन्ह्यातील दोषारोपपत्र न्यायालयात लवकर पाठवण्यासाठी 2 हजार रुपये लाच घेणाऱ्या संतोष बाळकृष्ण फडतरे या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे दोषारोपपत्र लवकर पाठवण्यासाठी हवालदार फडतरे याने 10 हजार रुपयांची लाच मगितल्याची तक्रार संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 12 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. आज रविवारी हवालदार फडतरे याला सापळा लावला होता. आज सकाळी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेल्यानंतर फडतरे याने संबंधिताला दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी 2 हजार रुपये मागितले. हे पैसे घेताना त्याला रंगेहाथ पकडले.ही कारवाई पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले यांच्यासह अविनाश सागर, संजय संकपाळ, संजय कलकुटगी, रवींद्र धुमाळ, श्रीपाद देशपांडे, सलीम मकानदार, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, सोहेल मुल्ला, सारिका साळुंखे – पाटील, राधिका माने, सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.