जत,प्रतिनिधी : जत तालुका हा क्षेत्रफळाने सांगली जिल्ह्याच्या 1/3 आहे.तालुक्यात सध्या तीव्र दुष्काळ पडला आहे.30 चारा छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी सध्या 115 टँकर चालु
आहेत, शेतीच्या सिंचनाचा प्रश्न फारच बिकट बनला आहे,लोकप्रतिनिधी कडून वारंवार पाठपुरावा करून ही प्रशासनाकडून या प्रश्नाची
सोडवणूक केली जात नाही,त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल बनले आहेत.यांचा विचार करून जत तालुक्याच्या सर्वागिंन विकासासाठी कायमस्वरूपी मोठा निधी द्यावा अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील वंचित 48 व अशतं 17 अशा 65 गावासाठी तत्वतः मान्यता दिलेली विस्तारीत जत म्हैशाळ उपसासिंचन योजनेचे काम त्वरीत चालू करावे.तालुक्यातील 67 रब्बी गावातील पीक आणेवारी 50 पैसे पेक्षा कमी आहे. तरी शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी.गैरसोयीचे 13 गावे संख अप्पर तहसिलला जोडलेले आहेत, गेले सव्वा वर्षापासून या गावातील सर्वसामान्य जनतेला त्रास सहन
करावा लागत आहे, ती गावे पुर्ववत जत तहसिलला जोडावीत.उमदी अप्पर तहसिल कार्यालयासाठी स्वतंत्र कर्मचारी मंजूर करून द्यावेत.वाळेखिंडी नवाळवाडी व बेवनूर या गावांचा टेंभू योजनेत समावेश करावा.मुख्य जत कॅनॉल (मायथळ) येथून खुदाई करून म्हैशाळ योजनेचे पाणी माडग्याळ ओढ्यात सोडणेत यावे.जत उत्तर भागातील संख महावितरण उपविभागाला जोडलेली 11 गावे जत उपविभागाला जोडण्यात यावीत.7/12 उतारे संगणीकरण करताना ऑपरेटर कडून अनेक त्रुटी झालेल्या आहेत. (क्षेत्र कमी जास्ती, नावे चुकीची )
त्यामुळे शेतक-याला नाहक त्रास होत आहे.त्यासाठी गाव निहाय मेळावे घेवून सातबारे दुरूस्त करून द्यावेत.या समस्यामुळे जतच्या जनतेचे हाल होत आहे.आपण व्यक्तिगत लक्ष घालून या प्रश्नांची सोडवणूक करणेसाठी प्रशासनाला सुचना द्याव्यात असेही शेवटी जमदाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.