जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील 42सह टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जतच्या सिमाभागात आलेल्या पाईपलाईनमधून तालुक्यातील पुर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करावा अशा मागणीचे निवेदन गोंधळेवाडी मठाचे हभप तुकाराम महाराजांनी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पूर्व भागातील गावासाठी सध्या अंकलगी येथील तलावातून पाणी भरण्यात येत आहे.तेच पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी दिले जाते.मात्र तलावातील पाणी दूषित असून पिण्यायोग्य किंवा वापरणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे.त्याशिवाय टँकर मागणी असणाऱ्या गावांना तातडीने टँकरने पाणीपुरवठा करावा. त्याचबरोबर सोलापुरातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या भुयार चिखली येथे पर्यंत थेट लोखंडी पाइपलाने पाणी आणण्यात आले आहे.तेथून पुढे 25 किलोमीटर असणाऱ्या जाड्डरबोबलाद, सोन्याळ, अंकलगी मार्गे संख परिसरात याच पाईपलाईन मधून पाणी आणणे शक्य आहे.त्याशिवाय ते पाणी स्वच्छ व मुबलक मिळेल.या भागातील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी संपविता येईल. त्यासंदर्भात प्रशासनाने शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवून सोलापूरच्या पाणीपुरवठा योजनेतून जत पूर्व भागातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्रशासनाने शासनाकडे करावी असे तुकाराम महाराजांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.