संख : संखसह परिसरात खासगी मोबाईल कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना कॉलिंग करताना तसेच इंटरनेट सेवा वापरताना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ग्राहकांना विविध प्रकारच्या योजनांची प्रलोभने दाखवून आपल्याकडे ग्राहक वर्ग खेचण्यासाठी मोबाईल कंपन्या प्रयत्न करत आहेत. मात्र सेवेच्या नावाने शिमगा सुरू असल्याने मोबाईल ग्राहक,भाविक, विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कंपन्यांनी मोबाईल सेवेत तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी केली जात आहे.
संखसह परिसरातील सुमारे 42 गावांचा संखशी नियमित संबंध येतो. त्यामुळे संख परिसरात मोठा मोबाईल ग्राहक वर्ग आहे. सुमारे पंधरा ते वीस हजार खासगी मोबाईल ग्राहकांची संख्या याठिकाणी आहे.त्याचबरोबर संख महावितरण विभाग व अप्पर कार्यालय, नियमित येणारे नागरिकांची ही मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे; पण खासगी कंपन्यांकडून नियमित म्हणावी तशी सेवा दिली जात नाही. ग्राहकांना आॅफर एक अन् सेवा वेगळ्याच दर्जाची दिली जात आहे.फोर जी सेवा तर फक्त कागदावरच आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून मागणी करूनही फक्त आश्वासनांच्या पलीकडे ग्राहकांच्या हाती काहीच लागत नाही.