जत, (प्रतिनिधी) :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बालपणापासून शिक्षणासाठी विविध स्तरावर संघर्ष करावा लागला. अनेक यातना सहन कराव्या लागल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरामुळेच बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली झाली असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उपाध्यक्ष व माजी सरपंच संजय कांबळे यांनी केले.ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे हे होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक शैक्षणिक सवलती मिळत आहेत. या सवलतींचा लाभ घेऊन आपली शैक्षणिक प्रगती केली पाहिजे असे सांगून मा. संजय कांबळे पुढे म्हणाले कि, आजच्या विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी कमी होत आहे. शिक्षकाnबद्दल आदर कमी होत आहे. शिक्षकाविषयी आदर कमी होणे म्हणजे हे अधोगतीचे लक्षण आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर राखला पाहिजे असे सांगून ते शेवटी म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वाचनामुळेच एवढे मोठे झाले, अफाट वाचनामुळेच अफाट ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला वेगळी दिशा दिली म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड वाचन केले पाहिजे.यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे म्हणाले कि, विद्यार्थी दिन साजरा करणे हे उदिष्ट नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन स्वता: ज्ञानसंपन्न बनविणे हा विद्यार्थी दिन साजरा करण्यापाठीमागची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी प्रतिकूल परस्थिती असतानादेखील शिक्षणाच्या माध्यमातून सर्व प्रतिकूल परस्थितीवर मात केली. समतेचे, न्यायाचे, स्वातंत्र्याचे, बंधुत्वतेचे आपण पाइक असले पाहिजे हि जाणीव समस्त मानवास डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी करून दिली.