शिक्षण हि एक आज-काल महत्वाची बाब झालेली आहे. शिक्षण हे प्रत्येकाने घेतलेच पाहिजे आपला मुलगा किंवा मुलगी याला आपण शिकवलेच पाहिजे. शिक्षण हे कोणत्याही विषयाचे घ्या, ते कोणत्याही भाषेमधून घ्या, आपली ऐपत आणि आपली क्षमता ओळखून शिक्षण घाई, हि मध्यवर्ती कल्पना धरून ” मास फिल्म्स, ड्रीम सेलर फिल्म्स या चित्रपट संस्थेने ” घुमा ” ह्या चित्रपटाची निर्मिती केली असून कथा-दिगदर्शन महेश रावसाहेब काळे यांचे आहे. छायाचित्रण योगेश कोळी यांचे असून संगीत जसराज-ऋषिकेश-सौरभ यांचे आहे. या मध्ये शरद जाधव, पूनम पाटील, आदेश आवारे, प्रमोद कसबे, तेशवानी वेताळ, शशांक दरणे,नंदकिशोर गोरे या कलाकारांनी भूमिका केल्या असून त्यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.
नामदेव कोठुळे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची कथा ह्यामध्ये चित्रित केली असून नामदेव ला संजी नावाची बायको, आणि विकास , गुणी [गणेश ] नावाची दोन मुले असतात, नामदेव शेतमजुरी करून आपला घरसंसार चालवीत असतो, विकास हा मोठा मुलगा त्याने शिक्षण अर्धवट सोडून दिलेलं असते आणि तो गावातील एका गॅरेज मध्ये कामाला असतो. तर गुणी [गणेश ] हा गावातील एका शाळेत मनापासून शिक्षण घेत असतो. त्याचे इंग्रजी चांगले असते, शाळेतल्या निबंध स्पर्धेत त्याने इंग्रजी मधून लिहिलेल्या निबंधाला बक्षीस मिळालेलं असते, मनापासून शिक्षणात रस घेणारा हा नामदेव चा मुलगा असतो,
नामदेवच्या मनांत गुणी-गणेशाला तालुक्याच्या इंग्रजी शाळेत घालावे असा विचार असतो, गावातील बागाईतदार वगैरे लोकांची मुले इंग्रजी शाळेत शिकत असतात. गणेशाने तेथे शिकावे असे त्याला वाटत असते. त्यासाठी नामदेव सतत प्रयत्न करीत असतो. गावातील उनाड आणि टवाळक्या करणारी माणसे त्यांची टिंगल करीत असतात, पण नामदेव तिकडे लक्ष देत नाही. अश्या विविध मानसिकतेचे चित्रण ह्या मध्ये आहे, अगदी बारीक-सारीक गोष्टी दिगदर्शकानी दाखवल्या आहेत. नामदेव आपली मुलाला शिकवण्याची जिद्द काही सोडत नाही, अनेक अडचणीला त्याला सामना करावा लागतो, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसते पण तो प्रयत्न करीत असतो. शेवटी त्याला यश मिळते कि नाही हे सिनेमात पाहायला मिळेल.
कलाकारांची कामे छान झाली आहेत, त्यांनी आपल्या भूमिका मनापासून केलेल्या जाणवतात, त्या भूमिका समजून त्याला न्याय दिलेला आहे. ह्या सिनेमातील पसायदान हे एक वेगळ्या धाटणीने सादर केलं आहे,अपूर्वा साठे ह्यांचं संकलन उत्तम आहे.
ह्या सिनेमात मांडलेला विचार हा प्रत्येक पालकाच्या मनातला आहे, आपल्या मुलाला मराठी मिडीयम मध्ये शिक्षण द्यायचे कि इंग्रजी मध्यमा मधून शिकवणाऱ्या शाळेत शिकायला पाठवायचे, हा विचार करताना आपल्या मुलाची गुणवत्ता, आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे ह्याचा विचार करून तसेच आपल्या मुलाला इंग्रजी मधील पुढील शिक्षण झेपेल कि नाही त्याचप्रमाणे शाळेच्या विकास कामासाठी मागितले जाणारे पैसे पालकांना देता येतील का इत्यादी अनेक प्रश्नावर हा सिनेमा भाष्य करतो,मुलांना आणि पालकांना समाधान कश्यात लाभेल हा विचार सुद्धा मांडला आहे. शिक्षण हे महत्वाचे आहे, शिक्षणाला महत्व द्या,भाषा हि औपचारिक आहे, तुम्ही भाषा शिका पण त्याचा अट्टाहास करू नका असा हि संदेश हा सिनेमा देतो.
घुमा म्हणजे एक प्रामाणिक प्रयत्न करून केलेली चित्रकृती आहे , असे म्हणावे लागेल.
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७