उमदी,संकेत टाइम्स : अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला विरोध करून पोलिसांत फिर्याद देण्यासाठी जात असताना विवाहित महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना जत तालुक्यात घडली. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात मुख्य संशयित विलास राठोड (रा.उमदी, ता.जत) याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.
तीस वर्षांची विवाहिता शेतात काम करत असताना संशयित विलास राठोड तेथे आला. तिच्याशी अश्लील भाषेत बोलू लागला. मात्र, तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ती घरी जात असताना त्याने हाताला धरून ओढत तुरीच्या पिकात नेले. तेथे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असताना तिची लहान मुले ओरडत आल्याने तिची सुटका झाली. तिने हा प्रकार सासू व आईस सांगितला.त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे ठरविले.
त्यानुसार पोलीस ठाण्याकडे जात असता विलास राठोडसह त्याच्या घरातील अन्य दोन पुरुष व दोन महिलांनी विवाहितेस बेदम मारहाण केली.तिला लाथा-बुक्क्यांनी व काठीने जबर मारहाण केल्याने तिच्या अंगावर वळ उठले आहेत. तिला चालता येणेही कठीण झाले आहे.तिने पाच जणांविरोधात उमदी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.