कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी सुमारे ६६ टक्के सूट मिळणार आहे. मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ५५ हजार ३७६ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी १११ कोटी ९७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण १०४ कोटी ३० लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये २४ हजार ७१८ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत.
त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचे एकूण ८६ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ५५ कोटी २५ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.