सांगली : बांधकाम व्यवसायिक माणिकराव विठ्ठल पाटील (वय ५४, रा. इंद्रनील प्लाझा अपार्टमेंट, राम मंदिरजवळ, सांगली) यांच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांच्या संयुक्त पथकाला बाराव्या दिवशी यश आले. कारंदवाडी (ता. वाळवा) येथील किरण लखन रणदिवे (वय २६), अनिकेत ऊर्फ निलेश श्रेणिक दुधारकर (वय २२), अभिजीत चंद्रकांत कणसे (वय २०) या तिघांना अटक केली.
खुनाचा छडा लागल्यानंतर माहिती देताना अधीक्षक दिक्षीत गेडाम म्हणाले, माणिकराव पाटील यांचे १३ ऑगस्ट रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यांचा शोध घेऊन १५ रोजी त्यांच्या अपहरणाची फिर्याद दिली. तर १७ रोजी त्यांचा मृतदेह कवठेपिरान येथे वारणा नदीपात्रात आढळल्यानंतर खून झाल्याचे उघड झाले.
हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांना सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पथक तपासात होते.आरोपींनी अपहरण करण्यापासून ते खून करण्यापर्यंत कोणताही पुरावा सोडला नव्हता. त्यामुळ तपासाचे आव्हान होते.खुनाच्या तपासासाठी जवळपास २०० ते ३०० जणांची चौकशी करण्यात आली.
अखेर गोपनीय खबरे आणि तांत्रिक तपासातून तिघांची नावे समोर आली. सुरवातीला त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतू कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
गेडाम पुढे म्हणाले, अटक केलेला किरण रणदिवे, अनिकेत दुधारकर, अभिजीत कणसे या तिघांना पैशाची गरज होती. किरण याने काहीजणाकडून पैसे घेतले होते. त्यांनी पैशाचा तगादा लावला होता. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याने अनिकेत व अभिजीत या दोघांना बोलवून कोणाचे तरी अपहरण करून पैसे मागण्याचे ठरवले.
बांधकाम व्यवसायिक माणिकराव पाटील हे तुंग येथील नाष्टा सेंटरवर येत असून त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती होती. त्यामुळे चोरीच्या मोबाईलवरून त्यांना कॉल करून प्लॉट दाखवण्यासाठी म्हणून बोलवून घेतले.
माणिकराव तेथे आल्यानंतर त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. माणिकराव यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांच्यात झटापट झाली. माणिकराव दंगा केल्यानंतर कोणीतरी बघेल म्हणून तोंड दाबून हातपाय बांधले. त्यामध्ये माणिकराव बेशुद्ध झाले. तेव्हा तिघांनी त्यांचे हात दोरीने बांधून त्यांच्याच मोटारीच्या डिकीत टाकले. त्यानंतर त्याना कवठेपिरान येथे नेताना डिकी उघडून बघितली. कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यामुळे ते मृत झाले असावेत असे समजून कवठेपिरान, दुधगाव येथून कुंभोज पुलावरून माणिकराव यांना नदीत टाकले. तर मोटार कोंडिगे फाटा येथे सोडून दिली.
पोलिसांसाठी या गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक होता. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता. अखेर पोलिसानी गेले १२ दिवस रात्रंदिवस तपास करून छडा लावला असल्याचे अधीक्षक श्री. गेडाम यांनी सांगितले.