संख : जतच्या राजकारणातील जेष्ठ नेते,सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संख (ता. जत) येथील बसवराज सिद्दगोंडा पाटील (वय ६५) यांचे मंगळवारी (दि.१९) रोजी सकाळी कर्नाटकातील विजापूर येथील रुग्णालयात निधन झाले.पाटील यांच्या निधनामुळे पुर्व भागातील ४६ वर्षानंतर जनतेचा आवाज थांबला आहे.बसवराज पाटील हे काका या नावाने तालुक्यात प्रसिद्ध होते.
सरपंच पदापासून ते उपाध्यक्ष पदापर्यंतचा ४६ वर्षांचा राजकीय प्रदीर्घ असा कालखंड आहे. मनमिळावू अभ्यासू, संयमी, कुशल संघटन चातुर्य, अजातशत्रू व द्रष्ट्या नेता म्हणून परिसरात ओळख होती.बसवराज पाटील यांचा दि.१ जून १९५८ रोजी जन्म झाला.वडील बापूराया (सिद्दगोंडा) पाटील हे मुलकी पोलिसपाटील होते.जिल्हा परिषद उपाध्यक्षपदीही त्यांनी प्रभावी काम केले आहे.संख परिसराचा कायापालट करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.मोठा जमाधान असलेले बसवराज काका यांच्या निधनाने राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बसवराज काका यांचे प्राथमिक शिक्षण संख येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये, माध्यमिक शिक्षण जत हायस्कूल येथे झाले.राजारामबापू पाटील यांच्याबरोबर १८ वर्षे काम केले. त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून २० वर्षे काम केले. १९७७ मध्ये जनता पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.त्यांनी जनता पक्षाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले.
२००७ च्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये संख गटातील तिन्ही जागा जिंकल्या होत्या.१९८९ मध्ये निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना केली.२००४ मध्ये जनसुराज्य पक्षात प्रवेश केला.जनसुराज्य शक्ती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्हणून काम केले. २०१२ मध्ये राष्ट्रवादी जनसमुदाय पक्षाची युती झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित तीन मुली, मुलगा, सून, भाऊ, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. उपसरपंच, सोसायटी संचालक सुभाष पाटील यांचे वडील होते. अंत्यसंस्कार बुधवारी दुपारी १२ वाजता होणार आहे.