संकल्प दुष्काळाचा संघर्ष १५८ दिवसाचा,आता होणार पाण्यासाठी लढा तीव्र

0
11
जत : २०१२, २०१८ पेक्षाही भयावह दुष्काळी परिस्थिती जत तालुक्यात निर्माण झाली आहे. या भयावह परिस्थितीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा कठीण प्रसंगी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून दुष्काळग्रस्त जतकरांच्या मदतीला धावून जाणार आहे. ‘संकल्प दुष्काळाचा संघर्ष १५८ दिवसाचा’ हे अभियान २०१८ मध्ये दुष्काळी परिस्थितीत हाती घेतले होते. १५८ दिवस दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात आली होती.  त्याचपद्धतीने येत्या एक जानेवारीपासून पुन्हा हे अभियान यावर्षी राबविण्यात येणार असल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन- २०१८ च्या भिषण दुष्काळप्रसंगी जत तालुक्यात तुकाराम बाबा महाराज यांनी संकल्प दुष्काळाचा संघर्ष १५८ दिवसाचा हा अभिनव उपक्रम राबविला होता.  तुकाराम बाबा दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले होते. तालुक्यातील प्रत्येक गावात शाळा, संस्था, ग्रामपंचायती यांना २५० हुन अधिक पाण्याच्या टाक्याचे वाटप त्यांनी केले होते. दुष्काळात मूठभर चारा, घोटभर पाण्यासाठी मुक्या जिवाचा संघर्ष सुरू झाला, जनावरे दावणीला टाचा घासू लागल्या अशा वेळी शासनाकडूही चारा छावण्या सुरू होत नव्हत्या. तुकाराम बाबांनी  राज्यातील पहिली खाजगी चारा छावणी गोंधळेवाडी ( संख) येथे सुरू केली.  दुष्काळाच्या या कठीण काळात त्यांनी दुष्काळग्रस्तांना मोठी मदत केली होती. दुष्काळ, कोरोना, महापूर, अपघात की जळीत घटना तुकाराम बाबा यांनी केलेली मदत मोठी आहे. दुष्काळी जत तालुक्यात म्हैसाळचे पाणी दाखल झाले पाहिजे यासाठी पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून पाण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली. पाणी परिषदा घेतल्या, गावोगावी दौरे केले. एवढेच नव्हे तर सन २०१९ मध्ये तुकाराम बाबा महाराज यांनी जतच्या इतिहासात प्रथमच विठ्ठलाच्या वारीप्रमाणे म्हैसाळच्या पाण्यासाठी संख ते मुंबई मंत्रालय ५०० किलो मीटर पायी दिंडी  काढत थेट मंत्रालय गाठले. याच वेळी जतला पाणी देण्यास पाणीच नसल्याचे उघड झाले होते. आश्वासने देणाऱ्या नेत्यांचे बिंब फुटले होते.

 

यंदा पावसाने दडी मारल्याने जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडला आहे. खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. येणाऱ्या काळात पाणी व चारा टंचाई निर्माण होणार हे निश्चित आहे तेव्हा आपण पुन्हा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना आवश्यक ती मदत कर्तव्य म्हणून पोच करणार असल्याचे सांगून तुकाराम बाबा म्हणाले, शासन व प्रशासनाने दुष्काळी जतकडे, जतकरांकडे पाठ फिरवली आहे हे उघड आहे. येणाऱ्या कठीण काळात श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून एक जानेवारीपासून मदत कार्य हाती घेण्यात येणार आहे. संख, सोन्याळ येथुन संकल्प दुष्काळाचा संघर्ष १५८ दिवसाचा हा उपक्रमास सुरुवात केली जाईल. या उपक्रमातंर्गत चारा छावणी, पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा तसेच पाण्यासाठी पुन्हा लढा उभारण्याचा मानस आहे.
शासन, प्रशासनाला जाग येणार केव्हा
जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडला असला तरी त्याचे सोयरेसुतक शासन, प्रशासनाला नाही. दुष्काळ जाहीर करावा म्हणून आपण थेट जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठाण मांडून बसलो. पालकमंत्र्यांची भेट घेतली पण त्याना पान्हा फुटला नाही. जतला दुष्काळ असताना पहिल्या यादीत जतचे नावच नव्हते यावरून शासनाचे धोरण लक्षात येते. जतची जनता दुष्काळात होरपळत असताना आजही म्हैसाळच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे हे दुर्देव आहे. शासन, प्रशासनाला जाग केव्हा येणार असा सवालही तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here