तासगाव, (अमोल पाटील) :राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात स्व. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र या मतदारसंघात आता ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा दिला जात आहे. अंजनी आणि चिंचणीकरांच्या विरोधात तिसऱ्या आघाडीने शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या (शुक्रवार) सावर्डे (ता. तासगाव) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास खासदार विशाल पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनीही दंड थोपटायला सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात माजी खासदार संजय पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्याचे सुतोवाच केले.
त्यामुळे ही निवडणूक आबा – काका या परंपरागत प्रतिस्पर्धी गटातच होण्याचे संकेत आहेत. गेली अनेक वर्षे तासगाव – कवठेमहांकाळची आमदारकी स्व. आर. आर. पाटील यांच्या घरातच आहे. त्यांच्या विरोधात स्व. दिनकर (आबा) पाटील यांचा तसेच माजी खासदार संजय पाटील यांचा गट निवडणुकीत उतरत होता. अंजनी व चिंचणी या दोन्ही गावच्या नेत्यांनीच आजपर्यंत मतदारसंघाचे राजकारण केले आहे. दोन्ही घराणी सोडून इतर कोणालाही मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाली नाही.
अनेक सामान्य लोक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू इच्छितात. मात्र त्यांना कधीच संधी मिळाली नाही. मतदारसंघाचा सातबारा स्वतःच्या नावाने असल्यासारखे दोन्ही घराणी राजकारण करत आहेत. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायची संधी द्यावी, असे कोणालाच वाटत नाही. जे मिळेल ते स्वतःच्या पोटावर ओढून घ्यायची प्रवृत्ती वाढीस लागत आहे. दरम्यान अनेक वर्षे एकाच घरात सत्ता असूनही मतदारसंघाचा अपेक्षित विकास झाला नाही, हे कटू वास्तव आहे.
मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. आर. आर. पाटील व संजय पाटील कुटुंब एकाही बेरोजगाराच्या हाताला काम देऊ शकले नाहीत. आज मतदारसंघात बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे. परिणामी गुन्हेगारी वाढत आहे. मतदारसंघात एकही औद्योगिक वसाहत, सहकारी संस्था, बँक अथवा मोठे व्यवसाय नाहीत. संस्था, बँक अथवा अन्य मोठे उद्योग उभारण्यात हे दोन्हीही नेते अपयशी ठरले आहे. परिणामी युवकांच्या हाताला काम देण्यात दोन्ही कुटुंबे नाकाम ठरली आहेत.
केवळ काही गावात पाणी योजना पूर्ण केल्याचा डांगोरा पिटला जात आहे. मात्र पाणी आले म्हणजे विकास होत नाही, हे या नेत्यांच्या लक्षात येत नाही. शेतीसमोर अनेक संकटे आहेत. द्राक्ष शेती संकटात आहे. कोणत्याही पिकाला हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्याचे कंबरडे अक्षरशः मोडून गेले आहे. शासकीय कार्यालयात सर्वसामान्य लोकांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. पैसे दिल्याशिवाय त्यांची कामे होत नाहीत. मात्र विद्यमान लोकप्रतिनिधींचा एकाही शासकीय कार्यालयावर वचक नाही. त्यांचे कोणीही ऐकत नाही. परिणामी प्रशासन मुजोर होत आहे. सामान्य लोकांची साधी – साधी कामेही होत नाहीत.
त्यामुळे सामान्य लोकांमध्ये संतापाची लाट आहे. त्याच – त्याच घरात असणारी सत्ता उलथवून लावण्याची गरज आहे. त्यासाठी या दोन्ही कुटुंबांच्या विरोधात कोणीतरी पुढे यावे. निवडणूक लढवावी. मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा सामान्य लोकांची आहे. मात्र ही दोन्ही कुटुंबे राजकारणात कोणालाही पुढे येऊन देत नाहीत. जे पुढे यायला बघतील त्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. त्यामुळे आजतागायत या दोन्ही कुटुंबांच्या विरोधात कोणीही राजकारणात पुढे आले नाही. ज्यांनी तसा प्रयत्न केला ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे तिसरा पर्याय मतदारसंघात पुढे आला नाही.
परिणामी, सामान्य लोकांचे वीस वर्षांपूर्वी होते ते प्रश्न आजही तसेच आहेत. त्यामुळे आता या दोन्ही कुटुंबांना पर्याय देण्यासाठी ‘नको अंजनी’ नको चिंचणी’चा नारा दिला जात आहे. या दोन्ही कुटुंबांपासून सत्ता हस्तगत करण्यासाठी तिसऱ्या आघाडीने कंबर कसली आहे. त्यामध्ये खासदार विशाल पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, ऍड. स्वप्नील पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, साहेबराव पाटील, आर. डी. पाटील, अरुण खरमाटे, डॉ. प्रताप पाटील, प्रदीप माने, विक्रांत पाटील यांच्यासह अनेकांनी तिसऱ्या आघाडीची मोट बांधली आहे. या आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर पर्याय उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या आघाडीच्यावतीने उद्या (शुक्रवार) सावर्डे (ता. तासगाव) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून तिसऱ्या आघाडीचे विधानसभेसाठी रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. ही तिसरी आघाडी दोन्ही कुटुंबांसाठी डोकेदुखी ठरणार आहे, हे मात्र नक्की.