कवठेमहांकाळ : जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून युवतीला गर्भवती करून गर्भपातास नकार दिल्यामुळे तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली. अश्विनी शिवाजी शिर्के (वय २१, रा. मोरगाव, ता. कवठेमहांकाळ) असे तिचे नाव आहे. तिचा व गर्भाचा खून केल्याप्रकरणी हणमंत रामचंद्र शिर्के या नात्यातील तरुणास अटक केली आहे. अश्विनीची बहीण सानिका शिवाजी शिर्के यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
नरघोल वस्ती येथे बेलदार वस्ती मार्गावर युवतीचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला होता. तिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा बनाव पोलिसांनी गतीने तपास करून गुन्हा उघडकीस आणला. तिला मृतावस्थेत दवाखान्यात दाखल करणारा नात्यातील हणमंत शिर्के याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाकी दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली.