जत तालुक्यातील हळ्ळी गावात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री सहा बंद घरे फोडून धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे. या चोरीत अंदाजे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
चोरीची माहिती पोलीस पाटील रवी दोडमणी यांनी दिल्यानंतर उमदी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने हळ्ळी गावात भेट देऊन घटनास्थळांची पाहणी केली. एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हळ्ळी गावात यापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. “आता तरी प्रशासनाने जागे होऊन चोरीच्या घटनांवर ठोस कारवाई करावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, उमदी पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात गस्त वाढविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.




