सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात मंजूर असलेली विकासकामे वेळेत पूर्ण न करणे, काम सुरू करण्यात दिरंगाई करणे अथवा हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम व स्पष्ट संदेश महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला आहे.
मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नर येथील रस्त्याचे काम वर्क ऑर्डर देऊनही सुरू न केल्याबद्दल संबंधित ठेकेदारावर पाच लाख रुपये इतका दंड ठोठावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ही कारवाई विकासकामांतील दिरंगाईबाबत प्रशासनाची शून्य सहनशीलता स्पष्ट करणारी ठरली आहे.
आज, सोमवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी आयुक्त दालनात सार्वजनिक बांधकाम विभागाची (जनरल फंड व जिल्हा नियोजन समिती-DPC अंतर्गत कामे) विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सन २०२४-२५ व २०२५-२६ मधील मंजूर विकासकामांची सद्यस्थिती, वर्क ऑर्डरची तारीख, कामाची मुदत आणि प्रत्यक्ष प्रगती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान वंटमुरे कॉर्नर रस्त्याच्या कामासाठी वर्क ऑर्डर असूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याचे निदर्शनास येताच आयुक्तांनी तत्काळ दंडात्मक कारवाईचे आदेश दिले.
यासोबतच शहरातील सर्व सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी आयुक्तांनी महत्त्वाचे निर्देश दिले. प्रत्येक कामासाठी साप्ताहिक व मासिक कृती आराखडा तयार करणे बंधनकारक करण्यात आले असून, दर १५ दिवसांनी प्रत्यक्ष भौतिक प्रगतीचा तुलनात्मक अहवाल सादर करणे आवश्यक आहे. तसेच सर्व सुरू असलेल्या व नव्याने सुरू झालेल्या कामांचे जिओ-टॅग फोटो सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
आयुक्त सत्यम गांधी यांनी शहर अभियंता श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, सर्व मंजूर विकासकामे निश्चित कालावधीत पूर्ण झालीच पाहिजेत. कोणत्याही पातळीवर हलगर्जीपणा, दुर्लक्ष किंवा टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही. कामात त्रुटी आढळल्यास केवळ ठेकेदारांवरच नव्हे, तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल.
या दंडात्मक कारवाईतून महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि जबाबदारीने पूर्ण करणे हे सर्व संबंधितांचे कर्तव्य आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई अटळ राहील.




