आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाला दिले निवेदन
जत : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचा विषय आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोग यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिनांक ५ फेब्रुवारी जाहीर केला आहे. मात्र, याच दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनी श्री मायाक्का देवी यांच्या वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस आहे.
या यात्रेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चारही जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर हजारो बैलगाड्या व लाखो भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच यात्रा असल्यास मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या घटण्याची गंभीर शक्यता असल्याचे आमदार पडळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या संदर्भात आज मुंबई येथे निवडणूक आयोगाचे सचिव श्री. सुरेश काकाणी यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. तसेच आयोगाचे आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा करण्यात आली.
लोकशाहीचा मूलभूत हक्क अबाधित राहावा व मतदारांचा व्यापक सहभाग सुनिश्चित व्हावा, यासाठी सकारात्मक व योग्य तो मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याअनुषंगाने सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या चारही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ अहवाल मागविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या सर्व प्रक्रियेनंतर लोकशाहीचा सहभाग अबाधित ठेवणारा सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.




