खरसुंडी जि.प. गटात रंगतदार लढतीची तयारी | भाजप–शिवसेना आमने-सामने, काँग्रेस-शिवसेना ऐक्याची शक्यता

0
22

२०१७ मध्ये खरसुंडी जिल्हा परिषद गटाची फेररचना झाल्यानंतर पूर्वीचे वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. दुसरीकडे, गतवेळचे अपयश पुसून काढण्यासाठी काँग्रेसला साथ देत शिवसेना नव्या रणनितीसह मैदानात उतरली आहे. गत निवडणुकीतील शिवसेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपच्या गोटात ‘फीलगुड’ वातावरण आहे; तर फेररचनेमुळे शिवसेनेतही आशावाद वाढला आहे.

आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागातील गावांचा समावेश असलेला खरसुंडी जिल्हा परिषद गट पूर्वी दिवंगत काँग्रेस नेते मोहनकाका भोसले यांच्या नेतृत्वामुळे चर्चेत होता. मात्र माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि अमरसिंह देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे २०१७ मध्ये काँग्रेसचे प्राबल्य कमी झाले. परिणामी, भाजपचे सहयोगी ब्रह्मानंद पडळकर यांनी अष्टरंगी लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळविला.

त्या निवडणुकीत काँग्रेसचे जयदीप भोसले आणि शिवसेनेचे चंद्रकांत भोसले यांच्यासह सात उमेदवारांचा पराभव झाला होता. आता फेररचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या खरसुंडी जि.प. गटात नेलकरंजी, गोमेवाडी, हिवतड, तळेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, खरसुंडी, घाणंद, बलवण, चिंचाळे, धावडवाडी, ओटेवाडी, कानकात्रेवाडी व मिटकी या गावांचा समावेश आहे.

हा गट खुला असल्याने भाजप व शिवसेना यांच्यात तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. गतवेळी विभागून लढलेल्या काँग्रेस–शिवसेनेत यंदा ऐक्याची शक्यता असून, त्यातच शिवसेनेचे माजी उमेदवार चंद्रकांत भोसले यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने सेनेला मोठा धक्का बसला आहे. भाजपकडून चंद्रकांत भोसले, जगन्नाथ कोळपे, नंदकुमार झंजे व राहुल गुरव इच्छुक आहेत; तर काँग्रेसकडून जयदीप भोसले शिवसेनेच्या साथीने मैदानात उतरतील, अशी चर्चा आहे.

खरसुंडी व नेलकरंजी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी खुला असल्याने राजकीय कुटुंबातील महिला प्रतिनिधी मैदानात उतरविण्याची कसरत दोन्ही बाजूंना करावी लागणार आहे. जातीय समीकरणे निर्णायक ठरण्याची चिन्हे असून, हिवतड ते बलवण या टोकापर्यंत पसरलेल्या गटात यंदाही चुरशीची लढत अपेक्षित आहे.

भाजपमध्ये गोपिचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांच्यात मनोमिलन झाल्याने पक्षात उत्साह आहे. तसेच वैभव पाटील समर्थक वर्गही भाजपच्या प्रचारात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत गेलेले राजेंद्र देशमुख यांची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, काँग्रेस–शिवसेना स्नेह वाढत असताना आमदार सुहास बाबर, जिल्हा बँक संचालक तानाजी पाटील आणि जयदीप भोसले हे भाजपच्या गोपिचंद पडळकर–अमरसिंह देशमुख जोडीसमोर आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत.

गत जिल्हा परिषदेत भाजपला तालुक्यात बहुमत मिळाले असले, तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत या गटात शिवसेना आघाडीवर होती. त्यामुळे ती आघाडी कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला, तर पूर्वीचा झेंडा उंचावण्यासाठी भाजपलाही मोठी कसरत करावी लागणार आहे.

गत निवडणुकीतील मते (खरसुंडी गट):

ब्रह्मानंद पडळकर – ७,६७६

जयदीप भोसले – ५,८८४

चंद्रकांत भोसले – ४,५९६

विलास पाटील – ४०४

अजित खंदारे – ११५

सचिन सातपुते – २०८

अभय माने – १६६

दत्तात्रय पावणे – ६६

उमेदवारी, संभाव्य बेरीज आणि विजयाची दिशा याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here