सांगली : केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत मित्र’ उपक्रमात सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बचत गटांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे पार पडलेल्या विशेष सोहळ्यात सांगलीतील सात महिला प्रतिनिधींनी सहभाग नोंदवत शहराचा मान उंचावला.
महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता. दि. १३ मार्च २०२६ रोजी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली हा ‘अमृत मित्र’ कार्यक्रम पार पडला.
या सोहळ्यात तेजस्विनी महिला बचत गट व समर्थ महिला बचत गटातील शारदा माळी, संगीता मंडले, राजश्री कोरे, वैशाली कोळी, वैशाली सर्वदे, सुलोचना कोळी आणि रेश्मा कांबळे या महिला प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. या पथकाचे तांत्रिक समन्वय समुदाय संघटक सदाशिव हंकारे यांनी सांभाळला.
या उपक्रमामुळे सांगलीतील महिलांना देशातील विविध राज्यांतील महिला बचत गटांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. उद्यान देखभाल व स्वच्छता क्षेत्रात कार्यरत असलेल्या या महिलांना व्यवसाय अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित करण्याचे मार्गदर्शनही मिळाले. जागतिक दर्जाच्या भारत मंडपम येथे झालेल्या सन्मानामुळे महिलांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील, समाज विकास अधिकारी नितीश माळी, शहर अभियान व्यवस्थापक ज्योती सरवदे, मतीन अमीन आणि किरण पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या संधीबद्दल महिला प्रतिनिधींनी प्रशासनाचे आभार मानत भविष्यात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“अमृत २.० अंतर्गत पायाभूत सुविधांसोबतच महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. दिल्लीतील या सन्मानामुळे इतर बचत गटांनाही प्रेरणा मिळेल,”
— सत्यम गांधी, आयुक्त
फोटो




