सोलापूर जिल्ह्यातील सांगोला-कडलास मार्गावरील माण नदीजवळ शनिवारी (२७ जून) दुपारी झालेल्या भीषण अपघातात उपचारासाठी रुग्णालयात निघालेल्या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. पत्नी गरोदर असल्याने वैद्यकीय तपासणीसाठी दोघे दुचाकीवरून सांगोल्याकडे जात असताना भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने ही हृदयद्रावक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की ट्रेलरच्या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत पती-पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र दोघांचाही जीव वाचवता आला नाही.
गरोदर पत्नीला उपचारासाठी घेऊन निघालेल्या या दांपत्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, न जन्मलेल्या बाळाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने ही घटना अधिकच वेदनादायी ठरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, संबंधित ट्रेलरचालकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघातामुळे सांगोला-कडलास मार्गावरील वाढते अपघात, अवजड वाहनांचा वेग आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी या मार्गावर कठोर वाहतूक नियंत्रण आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.




