जत : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील देऊळ केसराळ तलाव व आरवक्की तलाव परिसराची आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज बिळूर (ता.जत) येथे प्रत्यक्ष पाहणी केली. जत तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या पाहणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाहणीदरम्यान तलाव, बंधारे, ओढे तसेच पाण्याचे प्रवाह कोणत्या दिशेने जातात, म्हैसाळ योजनेचे पाणी कोणत्या भागापर्यंत पोहोचले आहे, कुठे अडथळे आहेत आणि उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसा मिळवून देता येईल, याची आमदार पडळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
जतच्या दुष्काळी शिवारात पाणी पोहोचविणे, तलाव व बंधारे भरून घेणे आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे, हा आपला प्राधान्यक्रम असल्याचे पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी गावागावांत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कामांची माहिती घेत संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग शेतीसाठी व्हावा, यासाठी प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याने तलाव, बंधारे आणि पाण्याच्या प्रवाहांची पाहणी करण्यात आली. अडचणी असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी अधीक्षक अभियंता महादेव कदम, अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) जयंत खाडे, कार्यकारी अभियंता काशिनाथ मासाळ, कार्यकारी अभियंता अमोल गुरव, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) विजय पाटील यांच्यासह उपअभियंता, शाखा अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोओळ : बिळूर (ता. जत) येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील देऊळ केसराळ व आरवक्की तलाव परिसराची आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी पाण्याच्या प्रवाहासह सिंचन व्यवस्थेची माहिती घेताना आमदार पडळकर व अधिकारी.




