सांगली : सांगलीवाडीतील डॉ. पतंगराव कदम कॉलेजसमोरील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी चक्क पळवून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली. मशीनमध्ये तब्बल १० लाख ३४ हजार ८०० रुपयांची रोकड होती. मशीनची किंमत सुमारे दीड लाख रुपये असून, रोकड आणि मशीन असा एकूण ११ लाख ८४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या घटनेमुळे सांगलीवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एनसीआर कार्पोरेशन इंडिया प्रा.लि.चे स्थानिक प्रतिनिधी विकास आमनगी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील एनसीआर कार्पोरेशन इंडिया प्रा.लि.कडून विविध जिल्ह्यांमध्ये बँकांची एटीएम मशीन बसविण्याचे काम केले जाते. सांगली जिल्ह्यात कंपनीची सुमारे ४० एटीएम मशीन असून, त्यापैकी ३५ मशीन सांगली शहरात आहेत. विशेष म्हणजे या एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक नियुक्त नसल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर चोरटे एटीएम केंद्राजवळ आले. सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून त्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. मशीनला जोडलेल्या वायरी तोडून त्यांनी संपूर्ण मशीनच घेऊन पोबारा केला. बुधवारी सकाळी एटीएम केंद्रातून मशीन गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच बँकेचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांनी कोणत्या वाहनाचा वापर केला आणि चोरीनंतर ते कोणत्या दिशेने गेले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात यापूर्वीही एटीएम चोरीच्या घटना घडल्या आहेत. मिरज तालुक्यातील बेडग-आरग रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने एटीएम उखडून नेण्यात आले होते. बुधगाव येथे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रोकड लंपास करण्यात आली होती. डफळापूर येथेही एटीएम मशीन ओढून नेण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे एटीएम केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि परिसरातील माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.




