जत तलाठी कार्यालयाचा कारभार ‘झिरो तलाठ्यां’च्या हाती?

0
1

जत : जत येथील तलाठी कार्यालयात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप वाढला असून कार्यालयाचा कारभार त्यांच्या हातात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला.

तलाठी व मंडल अधिकारी नामधारी असून, नागरिकांची कामे खासगी व्यक्तींमार्फत केली जात असल्याचा दावा ढोणे यांनी केला. या माध्यमातून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कार्यालयातील खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप तातडीने थांबवावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

सोमवारपासून खासगी व्यक्तींना कार्यालयातून हटविले नाही तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ढोणे यांनी दिला. याची दखल घेत जिल्हाधिकारी घोष यांनी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे आणि तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना तातडीने खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप थांबविण्याच्या सूचना दिल्या.

‘उपोषणाची वेळ येणार नाही. या प्रकरणात तातडीने योग्य कार्यवाही केली जाईल,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी ढोणे यांना सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

या प्रकरणामुळे जत तलाठी कार्यालयातील कामकाज आणि खासगी व्यक्तींच्या हस्तक्षेपाबाबत प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

फोटोओळ : जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडे जत तलाठी कार्यालयातील खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप थांबविण्याची मागणी करताना सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here