राज्यातून मान्सूनची माघार; तापमानात वाढीचा अंदाजपावसाची १९ टक्के तूट; दुष्काळसदृश स्थितीची तीव्रता वाढण्याची शक्यता

0
2


मुंबई, दि. ८ : राज्यातून यंदाच्या मोसमी पावसाने पूर्णपणे माघार घेतल्याची घोषणा हवामान विभागाने गुरुवारी केली. राज्यातून मान्सूनच्या परतीचा सरासरी कालावधी ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान असतो. मात्र, यंदा त्यापूर्वीच संपूर्ण राज्यातून मान्सून परतला आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच अनेक भागांत उकाडा वाढला आहे.

शनिवारपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता. ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णेपर्यंत परतीची रेषा बुधवारी स्थिर होती. त्यानंतर गुरुवारी उर्वरित राज्यातूनही मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. त्यामुळे राज्यात आता कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.

पावसाची मोठी तूट
सप्टेंबर महिन्यात राज्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल ५२ टक्के तूट नोंदविण्यात आली. संपूर्ण मोसमी हंगामात राज्यात सुमारे १९ टक्के पावसाची तूट राहिली आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे.

काही भागांत कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कोकण विभागातही उन्हाचा तडाखा जाणवत असून, नागरिकांना ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

जुलैमध्येच मिळाला होता दिलासा
यंदा तळकोकणात ६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. ८ जूनपर्यंत पाऊस हर्णे आणि सोलापूरपर्यंत पोहोचला होता. मात्र, त्यानंतर मान्सूनचा प्रवास काही काळ रेंगाळला. मुंबई आणि पालघरमध्ये २३ जूनला मान्सून दाखल झाला आणि २४ जूनपर्यंत त्याने संपूर्ण राज्य व्यापले.

जूनमध्ये पावसाची तूट निर्माण झाली असली, तरी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पाऊस झाल्याने राज्याला काहीसा दिलासा मिळाला. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने हंगामाच्या अखेरीस पावसाची तूट वाढली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here