म्हैसाळ, ताकारी सुरू; मग टेंभू योजनेलाच खोडा का? |आटपाडीच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

0
0

आटपाडी : जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत १५ नोव्हेंबरपासून टेंभू उपसा सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, तारीख उलटूनही टेंभूचे पंप सुरू न झाल्याने आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. म्हैसाळ आणि ताकारी योजना सुरू झाल्या, मग टेंभू योजनेलाच विलंब का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

यंदा पावसाने दगा दिल्याने सांगली जिल्ह्यासह आटपाडी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात जेमतेम १५० मिलिमीटर पाऊस झाल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. रब्बीच्या अवघ्या २० टक्के पेरण्या झाल्या असून, पाण्याअभावी चारा पिके आणि फळबागा सुकू लागल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

आश्वासनानंतरही पंप बंदच!

दरवर्षी १५ डिसेंबरला सुरू होणारे रब्बीचे आवर्तन यंदा दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे बैठकीत निश्चित झाले होते. या निर्णयाची मोठी प्रसिद्धीही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात टेंभू योजनेचे पंप अद्याप सुरू झालेले नाहीत. अधिकारी डिसेंबरमध्ये पाणी सोडण्याचे संकेत देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पिके जळाल्यानंतर पाणी देणार का?

डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा केल्यास चारा पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. कालवा समितीच्या बैठकीत रब्बीचे एक आवर्तन आणि पिण्यासाठी दोन वेळा पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

म्हैसाळ आणि ताकारीप्रमाणे टेंभू योजनेचेही पंप तातडीने सुरू करावेत. पिके पूर्णपणे जळून गेल्यानंतर पाणी सोडून काय उपयोग, असा सवाल करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला विलंब न करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here