तासगाव : तालुक्यातील कवठेएकंद येथे भाजपला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. येथील खासदार संजय पाटील गटाचे खंदे समर्थक कुमार माळी, केशव थोरात, वैभव कांबळे यांनी गुरुवारी आमदार सुमन पाटील यांच्या उपस्थितीत अंजनी येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर कवठेएकंद येथे खासदार गटाला हादरे बसले आहेत.
गेल्या काही दिवसांत खासदार संजय पाटील गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची नाराजी व खदखद उफाळून येत आहे. पहिल्या फळीतील कार्यकर्ते खासदारांविरोधात बंड करीत आहेत. त्यामध्ये तासगावचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी, सावर्डेचे सरपंच प्रदीप माने, सावळजचे माजी सरपंच अरुण पाटील, अनिल थोरात यांनी खासदारांविरोधात पक्षांतर केले आहे. खासदारांविरोधातील या हेबाळ्यातून गट सावरतो न सावरतो तोच आता कवठेएकंद येथे प्रमुख कार्यकर्त्यांची नाराजी ऐरणीवर आली आहे.
कवठेएकंद येथील कुमार माळी, केशव थोरात, वैभव कांबळे यांनी खासदार गटाला रामराम केला आहे. या सर्वांनी गुरुवारी आमदार सुमन पाटील यांच्या उपस्थितीत अंजनी येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला.
कवठेएकंद ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. याठिकाणी भाजप, राष्ट्रवादी व शेकापमध्ये काट्याची लढत होण्याची चिन्हे आहेत. सर्व गटांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. या गटांनी आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. 5 जानेवरीपासून प्रत्यक्ष प्रचारास सुरुवात होईल. तत्पूर्वी सगळ्याच गटांकडून कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकाऱ्यांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू आहे. शिवाय नाराजांची मनधरणीही सुरू आहे.
ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे असतानाच खासदार संजय पाटील गटाला नाराजीने ग्रासले आहे. या गटातील प्रमुख कार्यकर्ते कुमार माळी, केशव थोरात व वैभव कांबळे यांनी हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले असल्याने गावात भाजपसमोरील अडचणी वाढणार आहेत. या सर्वांनी या निवडणुकीत आपापले उमेदवारी अर्ज भरले आहेत.
या सर्वांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र थोरात, तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक घाईल यांच्यासह गावातील आजी – माजी पदाधिकारी, युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
*सोशल मीडियावर खासदारांची बाजू पोटतिडकीने मांडणार कार्यकर्ता दुरावला*
कुमार माळी हे खासदार संजय पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते होते. खासदार पाटील यांची सोशल मीडियावर खंबीरपणे बाजू मांडत होते. मी भाजपचा नाही तर खासदार पाटील यांचा कार्यकर्ता आहे. खासदारच माझ्यासाठी पक्ष आहेत, असे माळी नेहमी सांगायचे. मात्र गावातील अंतर्गत राजकारणात माळी यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी दिला जात होता. अंगी चांगले गुण असतानाही डावलले जात होते. त्यामुळे नाराजीतून त्यांनी आज खासदार पाटील यांची साथ सोडली. त्यांच्या रूपाने खासदार पाटील यांची सोशल मीडियावर पोटतिडकीने बाजू मांडणारा कार्यकर्ता दुरावला आहे, हे मात्र नक्की.