म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी लढा उभारणार ; प्रकाश जमदाडे
जत,प्रतिनिधी : म्हैसाळ विस्तारीत योजना व संख मध्यम प्रकल्पातील तलाव भरण्यासाठी 2 आक्टोबर पासून जनजागृती करून लढा उभारणार असल्याची माहिती बाजार समितीचे माजी सभापती तथा केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
जमदाडे म्हणाले की,म्हैसाळ योजना निधी अभावी आजही अपुर्ण आहे.योजना पुर्ण झाली तरीही 48 गावे पूर्णत:व 17 गावे अशंत:अशी 65 गावे पाण्यापासुन वंचित राहणार आहेत. यासाठी मार्च 2019 मध्ये विस्तारीत योजना महाराष्ट्र शासनास सादर केली होती.तत्कालीन सरकारने योजनेस तत्वतः मान्यता दिली होती.मात्र पुढे कार्यवाही झालेली नाही.
ते म्हणाले,गेल्या दिड वर्षापासुन सतत या योजनेचा पाठपुरावा करीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जलसंपदामंत्री जयंत पाटील तसेच खा.संजयकाका पाटील यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटुनही योजना मंजुरिविषयी विनंती केली आहे.1 जानेवारी 2020 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते.कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातुन मुख्य कॅनॉल व्हसपेठ येथून संख तलाव भरण्यासाठी ढोबळ अंदाजपत्रक महामंडळाकडे सादर केले आहे.

यातून व्हसपेठ, गुड्डापुर.आसंगी (जत), दरीबडची सिध्दनाथ आदी साठवण तलाव तर माडग्याळ,अंकलगी, सोरडी व गोंधळेवाडी इत्यादी ओढापात्रातून पाणी सोडण्याची तरतुद केली आहे. संख मध्यम प्रकल्पसुद्धा भरण्यासाठीची 1995 तरतुद ही च्या मुळ योजनेत आहे.
विस्तारित योजनेतून 50 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.योजनेसाठी दिड वर्षापासुन पाठपुरावा करत असुन आता निर्णायक लढयासाठी महात्मा गांधी जयंतीदिनापासून 65 गावात जावून सर्व ग्रामपंचायतचे ठराव तसेच सर्व पक्षाचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी, सर्व संस्थेचे पदाधिकारी यांची विनंती पत्रे घेऊन पालकमंत्री जयंत पाटील,खा. संजयकाका पाटील यांना ही योजना मंजुर करुन दुष्काळ कायमचा संपवावा अशी विनंती करणार आहे.तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पाणी संघर्ष समिती उमदी व शेतकरी बंधूंना सोबत घेऊन वंचित गावांच्या पाण्यासाठी निर्णायक लढा देणार आहे.तरी तालुक्यातील जनतेने ह्या लढ्यासाठी साथ द्यावी असे आवाहन प्रकाश जमदाडे यांनी केले.