जत बंदला 100 टक्के प्रतिसाद | व्यापारी पेठा,गावभाग,उपनगरे कडकडीत लॉकडाऊन
जत,प्रतिनिधी : जत शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाची साखळी रोखण्यासाठी जत शहर कोरोना नियंत्रण समितीने जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या जनताकर्फ्युला आज पहिल्या दिवशी जत शहरवासियांचा शंभर टक्के प्रतिसाद दिला.
जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे सहाशेच्या जवळपास रूग्ण आढळून आले आहेत.यापैंकी चोविस कोरोनाबाधित रूग्णांचे बळी गेले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची जत शहरासह तालुक्यातील संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालल्याने प्रशासनापुढे हा एक चिंतेचा विषय झाला होता. जत तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती विचारात घेता ती हाताबाहेर चालली असून जत शहर कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले आहे.त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जत येथिल माजी नगरसेवक व जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे यांनी पुढाकार घेऊन जत शहर कोरोना नियंत्रण समितीची स्थापना केली.या नियंत्रण समितेचे अध्यक्ष म्हणून जतचे तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच सांगली जिल्हा आर.पी.आय.चे विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची निवड केली.

नियंत्रण समितीचे अध्यक्ष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जत शहरातील सर्वच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना तसेच व्यापार संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यांना या समितीमध्ये घेऊन कांबळे यांनी कोरोनाविरूध्दची लढाई सुरू केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून जत शहरातील कोरोनाची वाढत चाललेली साखळी रोखण्यासाठी या समितीने आज शुक्रवार दि.11 सप्टेंबर पासून दहा दिवसांचा जनताकर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे.या जनताकर्फ्यु मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता जत शहरातील सर्वच दुकाने पूर्णपणे बंद आहेत. समितीचे अध्यक्ष कांबळे,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बिज्जरगी, कापड व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष पांडुरंग बामणे, जत नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक विजय ताड,तालुका काॅग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,दलित पॅथरचे नेते नगरपरिषदेचे सभापती भूपेंद्र कांबळे,सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे,गौतम ऐवळे,ब.स.पा.तालुकाध्यक्ष तानाजी व्हनखंडे,सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पाटील,उपाध्यक्ष किशोर माळी,व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रज्वल साळे, मंजूनाथ मोगली,विजय काटे,शिवसेनेचे नेते दिनकर पतंगे,ग्राहक तक्रार मंचचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले,आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते हे जनताकर्फ्यु चांगल्या प्रकारे पार पाडला जावा यासाठी अहोरात्र झटताना दिसत आहेत.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई,पोलीस निरीक्षक उत्तम जाधव,तसेच तालुक्यातील महसुल प्रशासन यांच्या सहकार्यामुळे दहा दिवसांचा हा जनताकर्फ्यु आम्ही शंभर टक्के यशस्वी करू व जत शहरासह तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडून जत शहरासह तालुक्यातील कोरोनाचे संकट दूर करू असा आम्हाला विश्वास आहे.यासाठी जतशहरवासियांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन ही कांबळे यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जतेत पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये जतकरांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.