म्हैसाळ योजना उद्यापासून सुरु होणार | जत तालुक्यातील लाभक्षेत्रातील तलावे भरणार
सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजना यावर्षी मार्च ते मे अखेर तीन महिन्यांसाठी उन्हाळी आवर्तना दरम्यान सुरु होती. पावसाचे आगमन झालेनंतर योजना बंद करण्यात आलेली होती. गतवर्षी कृष्णा नदीला पूर आलेला होता व अतिरीक्त पाणी वाहून गेले होते.
त्याअनुषंगाने पूर परिस्थिती दरम्यान वाहून जाणारे अतिरीक्त पाणी म्हैसाळ योजनेद्वारे उचलून कायमस्वरुपी दुष्काळी भाग असलेल्या तासगाव, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्याच्या लाभक्षेत्रातील तलाव व बंधारे भरुन घेतलेस पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचीत केले होते. त्यानुसार जलसंपदा विभागामार्फत याबाबत कार्यवाही करणेसाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे.
सद्यस्थितीत कृष्णा नदीला पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता मा. मंत्री महोदयांनी म्हैसाळ योजना आज दि.17 ऑगस्ट 2020 पासून कार्यान्वित करुन योजनेच्या लाभक्षेत्रातील कायमस्वरुपी दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव व बंधारे भरणेबाबत सूचना जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना दिल्या. यामध्ये साधारणपणे 2.50 टि.एम.सी पाणी उचलून लाभक्षेत्रातील 30 मोठे तलाव, 50 पाझर तलाव व 50 बंधारे भरण्याचे नियोजन आहे.

त्यानुसार सदर योजना आज दि.17 ऑगस्ट 2020 पासून कार्यान्वित होत आहे.दरम्यान जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या यामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत.जत तालुक्यातील पश्चिम, उत्तर,दक्षिण भागातील तलाव,बंधारे या पाण्यातून भरण्यात येणार आहेत.तालुक्यात रिमझिम पावसाने पिके जोमदार आहेत.पण तलावे,ओढापत्रे,अद्याप कोरडेच आहेत.म्हैसाळ योजनेतून ते भरण्यात येणार आहेत.
पुर्व भागात पाणी पोहविण्यासाठी प्रयत्न गरजेचा
जत पुर्व भागातील सर्वाधिक निसर्गाच्या प्रकोपाचा फटका बसलेला दुष्काळी भाग आहे.या भागात म्हैसाळ योजनेतून शक्य तेथपर्यत पाणी पोहचवावे,अशी मागणी यानिमित्ताने जोर धरत आहे.
उमदीपर्यत बंधिस्त पाईपलाईन व व्हसपेठ नजिकच्या नैसर्गिक नैसर्गिक उतारा उताराने पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे.कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर व म्हैसाळ योजनेतून या भागाचा सिंचनाचा प्रश्न हटवावा,अशी मागणी आम्ही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती,त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे.त्याचे आम्ही तालुक्याच्या वतीने आभारी आहोत. तालुक्यात शक्य तेथेपर्यत पाणी पोहविण्यासाठी जलसंपदा अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडावी,
असे आवाहन माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केले आहे.
