ऑगस्ट क्रांती दिन
आज 9 ऑगस्ट संपूर्ण देशात आजचा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा होत आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजांना हाकलून देणाऱ्या तमाम ज्ञात- अज्ञात क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरवात झाली.8 ऑगस्ट 1942 रोजी भारताला स्वातंत्र्य देणार असल्याची घोषणा इंग्रजांनी केली होती.
मात्र ऐनवेळी भारताला स्वातंत्र्य देणार नसल्याचे इंग्रजांनी सांगितले त्यामुळे महात्मा गांधींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला चले जाव आंदोलन असेही नाव देण्यात आले. करो या मरो अशी घोषणा या आंदोलनात करण्यात आली. दीडशे वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. 9ऑगस्ट रोजी महात्मा गांधींसह अनेक जेष्ठ नेत्यांना इंग्रजांनी अटक केली होती. त्यामुळे संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध संतापाची लाट पसरली होती. महात्मा गांधींना झालेल्या अटकेला विरोध करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला होता. इंग्रजांनी नेत्यांची धरपकड केल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागोजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना उत आला. सरकारने लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली. पण लोक सरकारचे आदेश मानण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला , गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. जणू लोकांनी इंग्रज सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यलयांना आगी लावणे, सरकारी खजिन्याची लुटालूट असे प्रकार सुरू होते. इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध संपूर्ण देश एकवटला होता. देशवासीयांच्या या एकजुटीने इंग्रजांना गुढघे टेकायला लावले होते. दुसऱ्या महायुद्धाने खिळखिळ्या झालेल्या ब्रिटिश सरकारची या आंदोलनामुळे उरलीसुरली ताकदही लोप पावत चालली होती. त्यानंतर देशवासीयांनी इंग्रजांना भारतातून हाकलून लावे पर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवले. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. या आंदोलनात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील ज्या मैदानावर तिरंगा फडकावून या आंदोलनाला सुरवात करण्यात आली होती त्या मैदानाला क्रांती मैदान असे नाव देण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1957 नंतरचा हा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा होता म्हणूनच या लढ्याला भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात खूप महत्वाचे स्थान आहे.

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
9922546295
