संख अप्पर तहसील कार्यालय ,अडचणीच जास्त | आजही अनेक कामे जत मधूनच : दुय्यम निंबधक कार्यालय सुरू करा; सुशीला होनमोरे
सोन्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील पूर्व भागातील संखसह उमदी,माडग्याळ तिकोंडी मुचंडी सर्कलमधील आदी गावातील लोकांना जमीनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि इतरकामी जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. संखला अप्पर तहसील कार्यालय होऊन जानेवारी 2020 मध्ये दोन वर्षे पूर्ण झाले असले तरी किरकोळ कामकाज व नाममात्र दाखले वगळता इतर महत्त्वाची कामे याठिकाणी होत नसल्याने संख अप्पर तहसील कार्यालयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा झाली आहे.तरी राज्यसरकारने जत पूर्व भागातील लोकांची गैरसोय दूर होण्यासाठी संख येथे कायमस्वरूपी मुद्रांक विक्रेत्यासह,नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करून,जत पूर्व भागातील लोकांची सोय करावी,अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीला होनमोरे यांनी लेखी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
जत हा तालुका सांगली जिल्ह्यातील विस्ताराने सर्वात मोठा असणारा कर्नाटक राज्याच्या सिमेवरील कायमस्वरूपी दुष्काळी असा तालुका आहे. भौगोलिक दृष्ट्या जत तालुक्याचा विस्तार खूप मोठा आहे.तालुक्याचे त्रिभाजन करून संख, उमदी व माडग्याळ येथे नवीन तालुका करण्याची येथील जनतेची अनेक वर्षापासून मागणी आहे.तालुक्याच्या विभाजनाचा प्रस्ताव 2004 पासून प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे. तालुक्यात 123 गावे व 276 वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. लोकसंख्या चार लाखाहून अधिक आहे.दोन लाख 24 हजार 538 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे. सांगली जिल्ह्यात भौगोलिक विस्ताराने सर्वात मोठा तालुका म्हणून जत तालुक्याची गणना केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्या इतके क्षेत्रफळ केवळ जत तालुक्याचे आहे,हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.विभाजन किंवा त्रिभाजन करून नवीन तालुका होण्यासाठी जनरेटा वाढल्याने तत्कालीन भाजपा सरकारने यावर जुजबी उपाय आणि मलमपट्टी म्हणून संख येथे अप्पर तहसील कार्यालय शुरू केले आहे.सध्या जत येथे मुख्य तहसिल कार्यालय आहे.संख अप्पर तहसिल कार्यालय अंतर्गत मुचंडी, माडग्याळ,उमदी,तिकोंडी,व संख असे पाच मंडल विभाग येतात.या पाच विभागात एकूण 67 गावे असून या सर्व गावाचा नाममात्र महसुली कारभार हा अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चालतो. परंतु या कार्यालयात ठोस असे कोणतेही कामकाज होत नसल्याचे आरोप आहेत.

संख येथे अप्पर तहसिल कार्यालय झाल्यापासून जत पूर्व भागातील नागरिकांची एकच मागणी वारंवार जोर धरू लागली आहे की, राज्य सरकारने ज्या प्रमाणे जत पूर्व भागातील लोकांची अप्पर तहसिल कार्यालयाची मागणी तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने पूर्ण करून विविध कामांनिमित्त ये-जा करण्यासाठी होणारा हेलपाटा, वेळ व पैशाची बचत करण्याचे काम केले आहे.त्याप्रमाणे इतर आवश्यक कार्यालय असणे महत्त्वाचे आहे.जमीन किंवा अन्य मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी महत्वाचे असलेले कार्यालय म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय होय. त्यासाठी नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करून लोकांची होणारी अडचण व कमालीची गैरसोय दूर करावी यासाठी सोन्याळच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीला होनमोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
संख येथे दुय्यम निंबधक कार्यालय असते तर…
जत येथे असणारे व नव्या जागेत स्थंलातर केलेले दुय्यम निंबधक कार्यालय लगतच कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने चौदा दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी,नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.संख येथे कार्यालय सुरू असते तर 67 गावातील नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागला नसता.एक कार्यालय बंद राहिले तर तालुक्यातील 124 गावांतील नागरिकांचे व्यवहार बंद पडत आहेत.त्यामुळे संख येथे दुय्यम निंबधक कार्यालय सुरू करणे काळाची गरज बनली आहे.
संखला अप्पर तहसील कार्यालय दोन वर्षापासून सुरू झाले आहे.मात्र येथे सर्वाधिक महत्वाचे जमीन,जागा खरेदी/विक्रीचे कार्यालय सुरू नसल्याने मोठ्या गैरसोय होत आहे.परिसरातील पाच मंडल विभागात 67 गावातील नागरिकांना यासाठी जत येथे मोठे अंतर कापून जावे लागत आहे. त्यात वेळ,व आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे दुय्यम निंबधक कार्यालयासह उर्वरित कार्यालयाचे कामकाजही संख येथूनच सुरू करावे.
कामण्णा पाटीलमाजी सरपंच,जालिहाळ खुर्द