मृतदेहांची विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लावण्यासाठी दक्षता घ्या

0

Rate Card

सांगली : राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोना बाधितांवरील उपचारासाठी खाजगी हॉस्पीटल अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारादरम्यान रूग्ण दगावल्यास त्यांची विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लागेल याबाबत काटेकोर दक्षता घ्या. यामध्ये शासनाने दिलेल्या मार्गदर्शक बाबींचे तंतोतंत पालन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

खाजगी हॉस्पीटल कोविड-19 रूग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध करून घेणे व त्यावर देखरेख ठेवणे यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत असताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, डॉ. निरगुंडे, डॉ. दिक्षीत उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अतिसौम्य लक्षणे असणारे किंवा लक्षणे नसणारे कोरोना बाधित रूग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सेंटर मध्ये येऊ नयेत व त्यांना कोविड केअर सेंटर मध्येच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी कोविड केअर सेंटर्सना आवश्यक सामग्री त्वरीत उपलब्ध करून द्या, असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले. तसेच अधिग्रहित केलेल्या हॉस्पीटल्समध्ये ज्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना सेवा आदेश देण्यात आले आहेत त्यांनी त्या ठिकाणी सेवा सुरू केली अथवा नाही याचा आढावा महानगरपालिका आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावरून घ्यावा, असेही सांगितले. अधिग्रहित केलेल्या हॉस्पीटल्सनी कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची उपलब्धता त्वरीत करून घेण्याबाबत संबंधित हॉस्पीटल मॅनेंजमेंटला निर्देशित करावे, असेही त्यांनी यावेळी यंत्रणांना सांगितले. या बैठकीत त्यांनी बेड इन्फॉर्मेशन सिस्टीमसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूपाबाबत संबंधित यंत्रणेतील सर्व घटकांना प्रशिक्षण देण्याबाबत निर्देशित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.