जबरदस्तीने काम केल्यास बेमुदत उपोषण | सांगोला-जत महामार्ग ; स्वा.शेतकरी संघटनेचा इशारा
जत,प्रतिनिधी : सांगोला – जत महामार्गावरील शेगाव हद्दीतील शेती जबरदस्तीने संपादित करून रस्ता काम सुरू केल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल,त्याशिवाय रस्त्याचे काम बंद पाडू,असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
खराडे,व अजिक्यतांरा प्रतिष्ठानचे अँड.प्रभाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली
रस्त्याच्या बेकायदेशीर काम बंद करा,या मागण्यासह शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली.
यावेळी शेती आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतोय देत नाय घेतल्याशिवाय राहत नाय,अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.मागण्याचे निवेदन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे,सांगोला-जत रस्त्याचे काम सुरू आहे.या कामासाठी कोणतीही पुर्व सुचना किंवा नोटीस न देता रस्त्याचे काम करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने करूनही प्रशासन दखल घेण्यास तयार नाही.या प्रश्नी उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे.मात्र उच्च न्यायालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वकील बाजू मांडण्यास हजरच राहत नाहीत.त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडत आहेत.शेतकऱ्यांचा महामार्ग करण्यास विरोध नाही,मात्र संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला योग्य मिळावा ही माफक अपेक्षा आहे.
मात्र कोणतीही भरपाई देण्यास शासन तयार नाही.म्हणूनच शेतकरी संतप्त झाले आहेत.जबरदस्तीने जमिनी संपादित करून रस्त्याचे काम सुरू केल्यास रस्त्याचे काम बंद पाडू,आणि त्याच ठिकाणी शेतकऱ्याच्या कुंटुबा सहित बेमुदत उपोषण करू,असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.खराडे,श्री.जाधव,अँड.सुरेश घागरे,काद्दप्पा धनगोंड,अँड.चंद्रकांत शिंदे,अँड.भारत शिंदे,सर्जेराव पवार, कल्लाप्पा नाईक,सुजित मोटे,पिंटू शिंदे, सुनील नाईक,सुरेश पाचीबरे,अनिल कुलकर्णी आदीसह शेतकरी उपस्थित होते.
सांगोला-जत महामार्गाचे अन्याय कारक काम बंद करावे,या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.मागण्याचे निवेदनही देण्यात आले.